माथेरानमध्ये रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग
By admin | Published: January 9, 2017 06:38 AM2017-01-09T06:38:30+5:302017-01-09T06:38:30+5:30
माथेरानमधील महात्मा गांधी रोड हा दस्तुरी नाका ते बाजारपेठ हा तीन किलो मीटरचा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर माथेरानकरांसह पर्यटकांची मोठ्या प्रमाणात
कर्जत : माथेरानमधील महात्मा गांधी रोड हा दस्तुरी नाका ते बाजारपेठ हा तीन किलो मीटरचा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर माथेरानकरांसह पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते; परंतु याच मुख्य रस्त्यावर गेल्या वर्षापासून कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले आहे. माथेरान पालिकेच्या प्रत्येक प्रभागात ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी कुंड्या बांधल्या होत्या. मात्र, बहुतेक ठिकाणी कचराकुंड्या तोडून, त्या जागेवर अतिक्र मण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ओला व सुका कचरा टाकायचा कुठे? हा प्रश्न पडतो.
प्रदूषणमुक्त माथेरानमध्ये वाहनांना पूर्णता बंदी असल्याने या ठिकाणी शहरात व संपूर्ण माथेरानमध्ये घोडा व हातरिक्षा हे प्रामुख्याने वाहन असल्याने शहरात घोड्यांच्या लिद मोठ्या प्रमाणात मातीत मिश्रित होत असतात. त्यामुळे येथील जनजीवनही धोक्यात येण्याचा संभव असल्याने पालिकेने लिदमिश्रित ओला व सुका कचरा संकलन करून, कचराकुंडीतच जमा करणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. माथेरानच्या श्री राम मंदिरच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला पालिकेचे कर्मचारी कचरामिश्रित लिद टाकत असल्याने, या ठिकाणी येथील वानर व माकडे खाद्याच्या शोधात कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर येतात. बाजूलाच विजेचा उच्च दाबाचा ट्रान्सफार्मर असल्याने विजेचा शॉक लागून अनेक वेळा माकडांचा जीव जाण्याच्या घटना घडतात.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्रीराम मंदिरात रोज सकाळी पर्यटकांसह स्थानिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी जात असतात; परंतु मंदिरच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळच्या डाव्या बाजूला कचऱ्याचे ढीग असल्याने येथील स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्याचप्रमाणे महात्मा गांधी रोडला लागून असलेल्या टपालपेटीच्या पुढील बाजूस तसाच कचरा रोज गटारात संकलन करून ठेवल्याने त्याही ठिकाणी दुर्गंधी पसरत असून, पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. तसेच कचऱ्यामुळे येथे मच्छरांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या निसर्गरम्य माथेरानला सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी माथेरान पालिकेने ठोस उपाययोजना करावी, येथील कचऱ्याची वेळच्या वेळ विल्हेवाट लावून कचरा वेळेत उचलला जावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)