खाडीपट्ट्यात सांडपाणी गळतीचे लागले ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:39 PM2018-10-21T23:39:43+5:302018-10-21T23:39:47+5:30
महाड औद्योगिक क्षेत्रामधील कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी खाडीपट्टा विभागातील कुंबळे गावालगत फुटल्याने येथील नागरिक संतप्त झाले आहेत.
- संदीप जाधव
महाड : महाड औद्योगिक क्षेत्रामधील कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी खाडीपट्टा विभागातील कुंबळे गावालगत फुटल्याने येथील नागरिक संतप्त झाले आहेत. वाहिनी दुरु स्तीचे काम पूर्ण झाले असले तरी वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात अपयश येत असल्याने ग्रामस्थांना सातत्याने शेती नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक रासायनिक कारखाने आहेत. या कारखान्यातील सांडपाणी एकत्रितपणे सामूहिक प्रक्रि या केंद्रात (सीईटीपी) साठवून त्यावर प्रक्रि या करून खाडीत सोडले जाते. सीईटीपी ते सांडपाणी सोडले जाणारे ठिकाण सुमारे २५ किमी दूर आहे. सांडपाणी वाहून नेताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास वाहिनी फुटते अथवा व्हॉल्वमधून गळती सुरू होते व हे सर्व सांडपाणी आजूबाजूच्या शेतात पसरते. काही दिवसांपासून सातत्याने अशाच घटना घडल्या आहेत. येथील व्हॉल्वची
दुरूस्तीही करण्यात आली होती. याच ठिकाणी ही सांडपाणी वाहिनी फुटली. रविवार सकाळीही पुन्हा सांडपाण्याची गळती सुरू झाली. सांडपाण्याच्या फवाºयांमुळे रस्त्यावरून जाणारी वाहने, पादचारी यांना त्रास सहन करावा लागला असल्याने पाण्याच्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले. फुटलेल्या सांडपाण्याच्या वाहिनीचे दुरुस्तीचे काम सध्या एमआयडीसीचे अधिकारी करीत आहेत.
औद्योगिक क्षेत्र स्थापन झाल्यानंतर सुमारे वीस वर्षांपूर्वी टप्प्याटप्याने सांडपाणी वाहिनीचे काम करण्यात आले. यातून रसायनमिश्रित पाणी सातत्याने जात असल्याने वायू निर्मिती व स्लज निर्मिती होत असते. या वाहिनीची मुदत संपली आहे. आता नवीन वाहिनी टाकण्याची गरज आहे. जुन्या वाहिनीचा व्यास गाळामुळे अरु ंद झाला आहे. त्यामुळे सांडपाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाल्याने व दाब वाढू लागल्याने वाहिन्या फुटणे व गळती होणे असे प्रकार वाढत आहेत.
वाहिनीतील स्लज साफ करणे अशक्य असल्याने येथे नवीन वाहिनी टाकणे हाच पर्याय आहे. सांडपाणी वाहिनी बदलण्याचा प्रस्ताव दहा वर्षापूर्वीच पाठवणे गरजेचे होते तसे न झाल्याने वाहिनी वेळेत बदलली गेली नाही. मागील वर्षी ग्रामस्थांनी आंदोलने केल्यावर ७६ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे.
वर्षभरात आठवेळा वाहिनीला गळती
कोल, वडवली, गोठे, चोचिंदे, मुठवली, जुई, कुंबळे, ओवळे, तुडील फाटा, रावढळ या ठिकाणी यापूर्वी अनेकदा वाहिन्या फुटल्या आहेत. मागील वर्षभरात आठ वेळा गळती झाली. यामुळे भातशेती व कडधान्ये पीक संकटात येत असते.
सांडपाण्याच्या वाहिनीसाठी ७६ कोटी रु पयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यावर आयआयटीचा अभिप्राय घेणे बाकी आहे. ते झाल्यावर हा प्रश्न मार्गी लागेल. तत्पूर्वी अस्तित्वात असलेल्या वाहिनीची स्थिती तपासण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
- पी.एस.ठेंगे, उपअभियंता, एमआयडीसी,महाड