वाणिज्य दराने दिली पाण्याची बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 11:53 PM2020-07-29T23:53:28+5:302020-07-29T23:53:28+5:30

लॉजिंग-बोर्डिंग मालक हैराण : माथेरानचा पर्यटन व्यवसाय ठप्प असल्याने सरासरी बिले आकारण्याची मागणी

Water bills paid at commercial rates | वाणिज्य दराने दिली पाण्याची बिले

वाणिज्य दराने दिली पाण्याची बिले

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : माथेरानमध्ये शासनाने पर्यटन व्यवसाय बंद केला आहे. त्यात माथेरानमध्ये पर्यटन वगळता, कोणत्याही स्वरूपातील व्यवसाय या शहरात नाही. त्यामुळे केवळ पर्यटक आले आणि व्यवसाय झाला, तर कुटुंब आपला उदरनिर्वाह करू शकतील. अशा माथेरान गावातील नागरिकांना पाणी वापराबद्दल वाढीव बिले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आली आहेत.
पर्यटन व्यवसाय ठप्प असल्याने शासनाने पाणी वापराची बिले यात १०० टक्के सूट द्यावी किंवा ती बिले रद्द करून केवळ सरासरी बिले आकारावी. अशी मागणी माथेरान लॉजिंग-बोर्डिंग मालक संघटनेने केली आहे. तर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यवसाय बंद असल्याने पाण्याचा वापर केलेला नाही आणि असे असताना देण्यात आलेली बिले अन्यायकारक असून, आपण सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेणार, असे आश्वासन दिले आहे.
ब्रिटिशांनी शोधून काढलेल्या माथेरान या पर्यटनस्थळावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी राज्य सरकारने मुंबईपासून सर्वात जवळ असलेले पर्यटनस्थळ १७ मार्चपासून बंद केले. तेथे बाहेरून कोणीही व्यक्ती शहारात येणार नाही आणि सर्व व्यवहार बंद राहतील, असे जाहीर केल्यानंतर चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तेव्हापासून माथेरान हे पर्यटनस्थळ ज्याची संपूर्ण मदार ही येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून असते.
तेथे १७ मार्चपासून एकही पर्यटक फिरकला नाही. त्यामुळे माथेरानकरांना दुसरे कोणतेही आर्थिक स्रोत नाहीत, शेती नाही, अशा स्थितीत माथेरानची अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. व्यवसाय पूर्णत: ठप्प असल्याने सामान्य कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. असे असताना माथेरान शहरात पाणीपुरवठा करणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवसाय करणाºया नोंदणीकृत लॉजधारक यांना वाणिज्य दराने पाणी वापराची बिले पाठविण्यात आली आहेत. पाण्याचा वापर झालेला नाही आणि असे असतानाही जीवन प्राधिकरणाकडून वाणिज्य दराने
पाणी वापर बिले पाठवली आहेत. त्यामुळे सर्व लॉजधारकांनी
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या अध्यक्षा प्रेरणा सावंत यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या
आहेत.

माथेरान नगराध्यक्षांना दिले निवेदन
व्यवसाय नसल्याने रूम्समध्ये राहायला कोणी आले नाही आणि असे असताना जीवन प्राधिकरणकडून पाणी वापराची बिले दिली जात आहेत. हे धक्कादायक असून, १७ मार्चनंतर आम्ही रूम्सही उघडल्या नसल्याने, हा अन्याय आमच्यावर होत असल्याचे निवेदन स्थानिक लॉजिंग चालक-मालक संघटना यांच्याकडून नगराध्यक्ष यांना देण्यात आले आहे.
संघटनेचे अध्यक्ष सागर पाटील यांनी या निवेदनाच्या प्रति कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता शानबाग यांना दिल्या आहेत.
तर नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी या प्रकरणी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत जीवन प्राधिकरणाकडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली आहे.
शहरात चार महिन्यांत एकही पर्यटक आला नाही आणि असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून वाणिज्य दराने बिल आकारावी ही खरे तर अन्यायाची भूमिका आहे. मात्र, शासनाने यावर तत्काळ निर्णय घेऊन लॉकडाऊन काळातील पाणी वापर बिले रद्द करावी.
- प्रेरणा सावंत, नगराध्यक्ष

'आमच्यावर हा अन्याय असून, आम्ही पाण्याचा वापरही केला नाही आणि एवढी बिले आली आहेत. त्यात आम्हाला वाणिज्यऐवजी घरगुती दराने बिले द्यायला हवी होती.'
- सागर पाटील, अध्यक्ष, लॉजिंग संघटना

आम्ही वाणिज्य बिलांबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळविले आहे. त्यांनी निर्णय घेतल्यावर बिलांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ.
- किरण शानबाग, शाखा अभियंता, जीवन प्राधिकरण
कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून लॉकडाऊन शासनाने घेतला आहे. मग त्या काळात माथेरान पर्यटक आले नाहीत, हे सत्य आहे आणि अशा वेळी तेथील संपूर्ण रोजगार आणि व्यवसाय बुडाला आहे. हे माहिती असतानाही प्राधिकरण अशी वाढीव बिले देणार असेल, तर मग त्या अन्यायाला वाचा फोडली जाईल आणि माथेरानकरांना न्याय दिला जाईल.
- महेंद्र थोरवे, आमदार,कर्जत

Web Title: Water bills paid at commercial rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.