जलवाहतूक बंद पण लालपरी सुसाट; पर्यटकांनी घेतला एसटी बसचा आधार
By राजेश भोस्तेकर | Published: May 29, 2023 09:42 AM2023-05-29T09:42:14+5:302023-05-29T09:42:31+5:30
अलिबाग स्थानकात प्रवाशांची गर्दी
लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग : उन्हाळी सुट्टी संपत आल्याने रायगडात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. शनिवार रविवार सलग सुट्यांमुळे पर्यटक अलिबाग मध्ये आले होते. मात्र जलवाहतूक बंद झाल्याने पर्यटकांनी एस टी स्थानकाचा आधार घेतला आहे. सोमवारी मुंबईकडे पर्यटकासह कामावर जाणाऱ्याची गर्दी सकाळीच आगारात झाली होती. त्यामुळे अचानक वाढलेल्या प्रवाशी संख्येने वाहतूक विभागाला जादा बस सोडाव्या लागल्या आहेत. जलवाहतूक बंद झाल्याने एस टीचे प्रवासी वाढल्याने विभागाला आर्थिक फायदा झाला आहे.
उन्हाळी सुट्टीचा मे महिन्यातील शेवटचा आठवडा शिल्लक राहिला आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. त्यामुळे शेवटच्या आठवड्यात शनिवार, रविवार पर्यटक उन्हाळी सुट्टी साठी जिल्ह्यात दाखल झाले होते. रविवारी परतीच्या प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला होता. तर जे पर्यटक जलवाहतूकिने प्रवास करणार होते. त्याची मात्र पंचायत झाली. पावसाळा हंगाम मुळे जलवाहतूक आठवडाभर आधीच बंद झाल्याने पर्यटकांचे हाल झाले होते.
अलिबागमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने दोन दिवस आले होते. जलवाहतूक बंद झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्यांनी सोमवारी एस टी स्थानकात धाव घेतली. त्यामुळे अलिबाग आगर हे प्रवाशांनी भरले होते. अचानक प्रवासी वाढल्याने नेहमीच्या जाणाऱ्या प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागला होता. अलिबाग आगारातून जादा बस फेऱ्या सोडून प्रवशाची सोय करण्यात आली. त्यामुळे अलिबाग आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.