कोकणात जल अभियान
By admin | Published: October 17, 2015 11:42 PM2015-10-17T23:42:01+5:302015-10-17T23:42:01+5:30
सागरीकिनारपट्टी व सह्याद्री पर्वतरांगा अशा अनुकूल परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊ स कोकणात पडत असला, तरी जल व्यवस्थापनाच्या अभावी हे सर्वच पाणी नद्यांच्या
- जयंत धुळप, अलिबाग
सागरीकिनारपट्टी व सह्याद्री पर्वतरांगा अशा अनुकूल परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊ स कोकणात पडत असला, तरी जल व्यवस्थापनाच्या अभावी हे सर्वच पाणी नद्यांच्या तीव्र उतारामुळे वाहून समुद्रात जाते. यामुळे पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या उन्हाळ्यात मात्र कोरड्या पडतात. पावसाळ्यात पूरस्थिती व उन्हाळ्यात अनेक गावांत पाण्याचे दुर्भिक्ष अशी विचित्र परिस्थिती कोकणात निर्माण होते. या परिस्थितीवर लोकसहभागातून मात करण्याकरिता, रॅमन मॅगसेसे पुरस्कार व जलसंवर्धनाकरिताचे नोबेल पारितोषिक प्राप्त जलपुरुष राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कोकणात जलबिरादरी महाराष्ट्र व कोकण भूमी प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून जल अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती कोकण भूमी प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह संजय यादवराव यांनी दिली आहे.
हे संपूर्ण अभियान जलपुरुष राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली चालवण्यात येणार आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त राजेंद्रसिंह यांना नुकतेच पाण्याचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजेंद्रसिंह यांनी राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशातील सता नद्या पुनर्जीवित केल्या आहेत. या नद्यांवर १३ हजार धरणे बांधून ४ जिल्हे सुजलाम सुफलाम केले आहेत आणि हे सर्व काम त्यांनी लोकसहभागातून करून दाखविले आहे.
कोकणातील नद्यांमधील अनेक वर्षे गाळ उपसा नसल्याने नद्यांचे डोह भरून गेले आहेत. नदीला पाणी नसल्याने नदीकाठ व आसपासच्या परिसरात पावसाळ्याव्यतिरिक्त शेती होत नाही. शेती नसल्याने रोजगार नाही. यामुळे संपूर्ण क्रयशक्ती मुंबई पुण्यात स्थलांतरित झाली आहे. गावात फक्त वृद्ध माणसे व मुले राहतात. हे सर्व बदलण्यासाठी पाणी हा मुख्य मुद्दा आहे. नद्यांवर छोटी छोटी धरणे बांधणे, नद्यांचे डोह पुन्हा खोल करणे, दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यांवर आधुनिक शेती, शेतीतून उत्पादित मालांवर आधारित प्रक्रिया उद्योग, प्रक्रिया उद्योगातून पर्यटनाचा विकास व पर्यटनातून संपूर्ण कोकणचा विकास अशा स्वरूपाचे हे जल अभियान हाती घेण्यात आले असल्याचे यादवराव यांनी
सांगितले.
या अभियानांतर्गत कोकण भूमी प्रतिष्ठान व जलबिरादरी महाराष्ट्रच्या जल अभियानाच्या माध्यमातून रत्नागीरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील जगबुडी नदी आणि राजापूर तालुक्यातील अर्जुना नदी या दोन नद्यांची निवड करण्यात आली आहे. लोकसहभागातून या दोन्ही नद्या बारमाही करणे. दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यावर आधुनिक शेती व यातून समृद्धी अशा स्वरूपाचे हे अभियान आहे. या नद्यांवर छोटी छोटी धरणे बांधणे, नद्यांचे डोह पुन्हा खोल करणे व नदी पुनर्स्थापित करणे अशा पद्धतीने पुढील पाच वर्षांत काम करण्यात येणार आहे.
मुंबई-मालवण जलपरिक्रमा
येत्या १ ते ५ डिसेंबर २०१५ या कालावधीत राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत मुंबई-मालवण अशी जलपरिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. कोकणातील अनेक नद्यांवर कार्यक्रम, पाणी व विषयात मोठ्या प्रमाणात जनजागृती, जगबुडी व अर्जुना या दोन नद्यांवर प्रत्यक्ष कामाची सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी पाचही दिवस डॉ. राजेंद्रसिंह यांची उपस्थिती लाभणार आहे.
३ डिसेंबरला खेड येथे जल चेतना परिषद
मुंबईपासून सुरू होणाऱ्या कोकण जल यात्रेत पनवेल, महाड, जगबुडी नदी क्षेत्र, चिपळूण, रत्नागिरी, अर्जुना नदी क्षेत्र, राजापूर, कणकवली, कुडाळ या ठिकाणी जल परिषदांचे व मेळाव्यांचे आयोजन करून इतर ठिकाणी लहान लहान शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल.
याचदरम्यान जगबुडी व अर्जुना नदीमध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ३ डिसेंबरला जगबुडी नदी खेड येथील जल चेतना परिषद व कार्यारंभ कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे उपस्थित राहाणार आहेत.
कोकणला जलसमृद्ध करणाऱ्या या जल अभियानात कोकणवासीयांचा मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित आहे. यामध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जलबिरादरी महाराष्ट्र व कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने यादवराव यांनी केले येत आहे.