खंडाळे गावात पंधरा दिवसांनी येते पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:10 PM2020-02-24T23:10:42+5:302020-02-24T23:11:11+5:30
ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा; महिलांसह लहान मुलांचीही दोन किमीची पायपीट
- निखिल म्हात्रे
अलिबाग : ऐन फेब्रुवारीतच तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. खेड्यापाड्यांतील महिला व लहान मुलांना दोन-दोन किलोमीटरची पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. तर काही ठिकाणी खाजगी टँकर चालकांकडून पाणी विकत घेतले जात आहे. नळाला चार दिवसांआड पाणी येत असल्याने ऐन उन्हाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खंडाळा ग्रामपंचायतीमधील गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावात १५ दिवसांनी एकदा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिक पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. पाणी आल्यावर नळावर मोठी गर्दी होत असून, वादाचे प्रसंगही ओढावत आहेत. गावात पाणी योजना राबविण्यात आल्या असल्या तरी पाणीटंचाईचे निवारण झालेले नाही. खंडाळा परिसरातील आजूबाजूच्या गावांना पुरेसे पाणी आहे. मात्र आम्हाला पाण्यासाठी वणवण का भटकावे लागते, असा प्रश्न येथील महिलांनी उपस्थित केला आहे. लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामपंचायत हद्दीत ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप संतप्त महिलावर्गाकडून करण्यात येत आहे.
रोजगारासाठी बाहेर जावे की पाण्याची वाट पाहत घरी बसावे, असा प्रश्न येथील महिलांपुढे आहे. पाणीपुरवठा करणारे कर्मचारीही योग्य माहिती देत नसल्याची तक्रार महिलावर्गाकडून करण्यात येत आहे. अलिबाग पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसभा घेऊन पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. दोन वर्षे उलटूनही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.
ग्रामस्थांवर स्थलांतरित होण्याची वेळ
ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान पिण्याच्या पाण्यासंबंधी विविध प्रलोभने दाखविण्यात आली होती. मात्र निवडणूक झाल्यावर पाण्याचा प्रश्न जैसे थे आहे. गावात पाणीटंचाईने उग्ररूप धारण केल्यामुळे काहींनी केवळ पाण्यासाठी स्थलांतर केले आहे. पाण्याचा प्रश्न असाच कायम राहिला तर सर्वच ग्रामस्थांसमोर स्थलांतराशिवाय पर्याय राहणार नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी दरवर्षी महिला एकत्र येऊन ग्रामपंचायतीवर मोर्चाही काढतात; मात्र निर्ढावलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येते. शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नसल्याने अनेक व्याधींनाही सामोरे जावे लागत आहे. याबरोबरच उद्योगधंदा व नोकरी करणाºया महिलांना पाण्यासाठी घरी थांबावे लागत असल्याची माहिती पूर्तता वेळे यांनी दिली.
अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रामपंच्यातीचा पाणी प्रश्न सध्या चांगलाच पेटला आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी जिल्हा परीषदेत पाणी पुरवठा अभियंता संजय वेंगुर्ळेकर यांच्याशी संपर्क साधला असता, आपली जबाबदारी झटकून, स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधा, असे उत्तर देण्यात आले. याबरोबर स्थानिक पाणीपुरवठा अधिकारी एकनाथ कुदळे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.