ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये पाणीप्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 01:09 AM2020-05-12T01:09:18+5:302020-05-12T01:10:42+5:30

ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील एका बिल्डरने ७ मेच्या मध्यरात्री आपल्या इमारतीला पाण्याच्या पाइपलाइनचे काम करण्यास सुरुवात केली. अंधारात सुरू असलेला हा खेळ ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या मदतीने उघडकीस आणला व सुरू असलेले काम रोखले.

 Water crisis erupts in Mamdapur Gram Panchayat | ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये पाणीप्रश्न पेटला

ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये पाणीप्रश्न पेटला

Next

- कांता हाबळे 
नेरळ : कर्जत तालुक्यातील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत पाण्याची समस्या गंभीर आहे. गावातील पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेता, ग्रामपंचायत हद्दीत उभ्या राहणाऱ्या इमारतींसाठी सध्या पाणी जोडणी देऊ नये, असे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सरपंच यांच्या एकमताने ठराव घेतला गेला होता. मात्र तरीही या ठरावाला फाटा देत आर्थिक हव्यासापोटी परस्पर ग्रामपंचायतीला हाताशी धरून काही नेतेमंडळी बांधकामासाठी पाणी देत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीतील काही सदस्य करत आहेत. या प्रकारामुळे ग्रामपंचायतीतील पाणीप्रश्न चांगलाच तापला आहे.

ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील एका बिल्डरने ७ मेच्या मध्यरात्री आपल्या इमारतीला पाण्याच्या पाइपलाइनचे काम करण्यास सुरुवात केली. अंधारात सुरू असलेला हा खेळ ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या मदतीने उघडकीस आणला व सुरू असलेले काम रोखले. त्यावरून ग्रामस्थ व बिल्डर यांच्यात बाचाबाचीही झाली. याचवेळी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेला रस्ताही कोणतीही परवानगी न घेता संबंधित बिल्डरने फोडला आहे. मुळात ग्रामपंचायत हद्दीत पाण्याची भीषण टंचाई असताना बिल्डरला पाणी कसे पुरवले जाते, असा प्रश्न ग्रामपंचायत सदस्या आरती सुनील सोनावळे व कल्पना डांगरे यांनी उपस्थित केला आहे. या वेळी ग्रामपंचातीच्या प्रशासनासोबत आर्थिक व्यवहार केल्याचे बिल्डरने उघड केले. त्यामुळे ममदापूर ग्रामपंचायतीत वातावरण तापले आहे. या प्रकरणी ममदापूर ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांना विचारणा केली असता, आरोपांचे खंडन करून संबंधित बिल्डरविरोधात लवकरच कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाढते शहरीकरण लक्षात घेता, पाण्याचे स्रोत व पाणीसाठा वाढविण्यासाठी उपाययोजना आखणे गरजेचे आहे. स्वत:ची हक्काची पाणी योजना पूर्ण होत नसल्याने गावासह वाडी आणि आता येथे उभ्या राहणाºया इमारतींचाही पाणीप्रश्न गंभीर बनत आहे.
या प्रकरणात ममदापूर ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या मागे उभी राहते की बिल्डर लॉबीच्या, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बिल्डर लॉबीला पाणी न देता ग्रामस्थांच्या पाण्याच्या मागणीला प्राधान्य देण्याचा ठराव घेतला होता. तरीही बिल्डर लॉबीला पाणी दिले जाते. बिल्डर म्हणतो आम्ही तुमचे सदस्य व ग्रामसेवक यांना पैसे दिले आहेत. असे व्यवहार होत असतील तर दोषींवर कारवाईसाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारू.
- आरती सोनावळे, ग्रामपंचायत सदस्य

पाणी जोडणीच्या कामासाठी कोणतीही परवानगी किंवा ना हरकत दाखला दिलेला नाही. नेरळ ग्रामपंचायतीकडून त्यांनी पाणी जोडणी घेऊन परस्पर काम सुरू केले आहे. तेव्हा या कामाविरोधात ग्रामपंचायत आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करेल.
- दामू हिरू निरगुडा, सरपंच

ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत पाणी जोडणीसाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. ग्रामपंचायतीची व ग्रामसेवक यांनी पैसे घेतले असा आरोप संबंधित बिल्डरने करून बदनामी केली आहे. याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू.
- संजय राठोड, ग्रामसेवक

Web Title:  Water crisis erupts in Mamdapur Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.