रायगडवर पाणीटंचाईचे संकट; जिल्ह्यातील ११९ गावे, वाड्यांना झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 01:39 AM2020-04-25T01:39:46+5:302020-04-25T01:39:53+5:30
पेण, रोहा, पोलादपूर, महाड तालुक्यात समस्या
- निखिल म्हात्रे
अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच अनेक भागांत आता पाणीटंचाईचेही सावट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील ११९ गावे आणि वाड्यांमध्ये टंचाईच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ३ हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, गेल्या वर्षी साडेचार हजार मिलिमीटर पावसाची जिल्ह्यात नोंद झाली. सरासरीपेक्षा कितीतरी जास्त पाऊस झाल्याने यंदा रायगड जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून पेण, रोहा, पोलादपूर आणि महाड तालुक्यातील अनेक गावांत पाणी समस्या निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.
पेण तालुक्यात ९ गावे, ६१ वाड्या, रोहा तालुक्यात ४ गावे, २ वाड्या, महाड तालुक्यात १ गाव २ वाड्या, तर पोलादपूर तालुक्यात १३ गाव, २७ वाड्या अशा ११९ गाव-वाड्या तहानेने व्याकुळ झाल्या आहेत. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे. ही बाब लक्षात घेऊन आता १२ टँकर्सच्या मदतीने या गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पाणीटंचाई असलेल्या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. गरज असेल तेथे विंधन विहिरी खोदण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी पाणी योजनांची कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पोलादपूरमधील ४० गावांना चार टँकरने पाणी
पोलादपूर : एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तर दुसरीकडे पाणीटंचाईग्रस्त गावांची वाढती संख्या या दुहेरी संकटाचा सामना सध्या ठिकठिकाणी करावा लागत आहे. पोलादपूर तालुक्यातील १३ गावे २७ वाड्यांसाठी तालुक्यातील तीन टँकर मालकांच्या चार टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती पंचायत समिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली.
पोलादपूर तालुक्यात १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये ४६ गावे आणि १२३ वाड्यांचा समावेश टंचाई निवारण आराखड्यात करण्यात आला होता. यापैकी सद्य:स्थितीत १३ गावे २७ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टंचाईग्रस्त ४0 गाव-वाड्यांमध्ये केवनाळे, चांभारगणी बु. व खुर्द, किनेश्वर, निवे, ताम्हाणे, आड, दाभिळ, सडेकोंड, सडे, बोरघर, वाकण, नानेघोळ या गावांसह केवनाळे आंबेमाची, बोरघर बौद्धवाडी, महादेवाचा मुरा, वडघर - दिवाळवाडी, सनसपेढा, पवारवाडी, उलालवाडी, सणसवाडी, फौजदारवाडी तर कामथे येथील जांभडी, फौजदारवाडी, शेंबिवाडी, आदिवासीवाडी, देऊळवाडी किनेश्वर, मोरसाडे गावातील वाड्यांना चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती पंचायत समिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली.
कोणीही पाण्यावाचून राहणार नाही - कांबळे
पोलादपूर तालुक्यातील १३ गावे २७ वाड्यांना चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तर १ गाव, ८ वाड्यांसाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे, तो प्रलंबित आहे. २१ एप्रिल रोजी ६ गावे व ४ वाड्यांचे मागणी अर्ज पंचायत समिती येथे प्राप्त झाले आहेत. हे अर्ज लवकर जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येतील, अशी माहिती पोलादपूर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे जी.ई. कांबळे यांनी दिली आहे. कोणतीही गाव-वाडी पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी महसूल तालुका प्रशासन व पंचायत समिती प्रशासन प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.