नागोठणे येथे जलवाहिनी फुटली
By admin | Published: February 20, 2017 06:21 AM2017-02-20T06:21:01+5:302017-02-20T06:21:01+5:30
येथील एमआयडीसीकडून जेएसडब्ल्यू कंपनीकडे जाणारी जलवाहिनी फुटून वाहणारे पाणी शेतात घुसल्याने शेतात लागवड
नागोठणे : येथील एमआयडीसीकडून जेएसडब्ल्यू कंपनीकडे जाणारी जलवाहिनी फुटून वाहणारे पाणी शेतात घुसल्याने शेतात लागवड केलेली वाल - पावटा कडधान्यांची पिके धोक्यात आली आहेत. ही जलवाहिनी जेएसडब्ल्यू कंपनीचीच असून पाणी शेतात घुसल्याने कडधान्यांची पिके कुजणार आहेत, असे नुकसानग्रस्त शेतकरी तथा वरवठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणपत किसन म्हात्रे यांनी
सांगितले.
येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने के. टी. बंधारा ते जेएसडब्ल्यू कंपनी, डोलवी अशी जलवाहिनी कार्यरत आहे. शनिवारी मध्यरात्री रेल्वे फाटकानजीक ही जलवाहिनी फुटल्याने त्यातून वाहणारे पाणी परिसरातील शेतीत घुसले. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत फुटलेल्या जलवाहिनीतून पाणी वाहत होते असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. सध्या या भागातील बहुसंख्य शेतांमध्ये वाल, पावटा, तूर, चवळी आदी कडधान्यांचे पीक लावले असून शेंगा बहरायला प्रारंभ झाला असतानाच अचानक ही जलवाहिनी फुटून त्यातील पाणी शेतात घुसल्याने उभे पीक नष्ट होण्याच भीती निर्माण झाली आहे. साधारणत: २५ ते ३० एकर शेतात हे पाणी घुसले असून त्यात वरवठणे गावातील गणपत म्हात्रे, उत्तम म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे, रामा म्हात्रे, संतोष म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, देवीचंद भोय, चंद्रकांत भोय, शांताबाई म्हात्रे आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे. (वार्ताहर)