रायगडमध्ये भूगर्भातील जलपातळीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:26 PM2019-03-15T23:26:22+5:302019-03-15T23:26:36+5:30
पाच वर्षांच्या सरासरीत ०.४९ मीटरने कमी; भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने के ली पाहणी
- जयंत धुळप
अलिबाग : भूगर्भातील बेसुमार पाण्याचा उपसा आणि पावसाचे नैसर्गिक पाणी जमिनीत मुरण्याचे कमी झालेले प्रमाण या प्रमुख कारणांबरोबरच नैसर्गिक जंगलांची होणारी बेकायदा कत्तल आणि सिमेंट काँक्रीटचे वाढत चाललेले जंगल, यामुळे रायगड जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात चिंताजनक घट होत असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. डिसेंबर २०१८ मध्ये घेतलेल्या नोंदीनुसार गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी भूजल पातळीत ०.४९ मीटरने घट झाल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना, पाणी अडवा पाणी जिरवा यासारख्या योजना राबविण्यात आल्या आहेत, तरीही जलसाठ्यात भर पडलेली नसल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याचा बहुतांश भाग हा बेसाल्ट नामक अग्निजन्य खडकाने व्यापलेला आहे. या खडकाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता मुळातच कमी असते. म्हसळा, श्रीवर्धन, तळा व मुरु ड या तालुक्यामध्ये डोंगरमाथ्यावर लॅटेराईट या प्रकारातील खडक आढळतो. या खडकात काही प्रमाणात पाणी टिकून राहते. दरम्यान बेसुमार होणारी वृक्षतोड यामुळे डोंंगर माथ्यावर पडणाऱ्या पावसाचे पाणी डोंगरास तीव्र उतार असल्याने अत्यंत वेगाने थेट समुद्रात वाहून जाते. परिणामी जिल्ह्यात विक्र मी प्रमाणात पाऊस पडून देखील त्यातील फारसे पाणी जमिनीत मुरत नाही, परिणामी भूजलपातळीत वाढ होत नाही,अशी मुख्य समस्या आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस माथेरान या गिरीस्थानी पडतो, परंतु या परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सरासरीने०.१२ मीटरने घटली आहे. किनारी भागातील अलिबाग आणि उरण या दोन तालुक्यातील भूगर्भात गोडे पाणी झपाट्याने कमी होत आहे. गोड्या पाण्याची जागा खाऱ्या पाण्याने घेतल्याने बोअरवेल्स आणि विहिरी यांना खारे पाणी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. रायगडमध्ये ६० टक्के पाणीपुरवठा विहीर, बोअरवेल यांच्या माध्यमातून होते. परंतु हेच पाणी खारे होत असल्याने पाणीपुरवठा योजनांमधून मिळणारे पाणी अनेक गावांमध्ये पिण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतींच्या आहेत. भूगर्भात कमी झालेले पाणी आणि किनारी भागात विहिरींचे गोडे पाणी खारे होण्याच्या प्रमाणात झालेली वाढ यामुळे भविष्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती भूगर्भ सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने अहवालात नमूद आहे.
नैसर्गिक पाणी जिरवणे गरजेचे
रायगड जिल्ह्यातील भविष्यातील गंभीर पाणीटंचाईची समस्या टाळण्याकरिता जिल्ह्यात पावसाचे नैसर्गिक पाणी जिरविण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असा उपाय रायगड भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डी.बी. ठाकूर यांनी सुचविला आहे.
दर चार महिन्यांनी भूजल सर्वेक्षण केले जाते. मात्र, अलीकडे नोंदविण्यात आलेल्या नोंदी विशेष लक्ष वेधून घेणाºया आहेत. सुधागड आणि पोलादपूर या दोन तालुक्यातील डोंगराळ भागात काही विहिरींमध्ये कमालीची घट झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
भूजल पातळीत घट होण्याची कारणे
बेसुमार जंगलतोड आणि वणव्यांमुळे नष्ट होणारी वृक्षराजी.
शहरीकरण होत असताना सिमेंट काँक्रीटने जमीन झाकली जावून पाणी जमिनीत मुरण्यात निर्माण झालेला अडसर.
रेनवॉटर हार्वेस्टिंगचे अपेक्षित प्रयत्न अपुरे.
पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेच्या नियोजनातील तांत्रिक चुका.
बोअरवेल्सच्या माध्यमातून बेसुमार जलउपसा.
नैसर्गिक जलस्रोत असणाºया नद्यांतील पाणी प्रदूषणाने दूषित होणे.
खाडी व समुद्र किनारच्या भागातील विहिरींमध्ये पाझरणारे खारे पाणी.