कांता हाबळेनेरळ : नेरळ रेल्वेस्थानकाच्या पूर्व भागात मागील तीन दिवसांपासून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मध्य रेल्वेने तेथे नवीन साकव पूल तयार केला असून, त्या वेळी सर्व जलवाहिन्या तुटल्या आहेत. या सर्व जलवाहिन्यांमधून पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असून रेल्वेने जलवाहिन्या तोडल्याने नेरळ पूर्व भागात ऐन उन्हाळ्यात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.
नेरळच्या पूर्व भागात, फलाट एकच्या बाहेर असलेल्या लोकवस्तीत पाडा गेट येथून रेल्वेलगत जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. स्थानकात कर्जत एण्डकडे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी नवीन साकव मध्य रेल्वेने बांधले आहे. या वेळी मोरी बांधताना ठेकेदाराने येथून जाणारी जलवाहिनी तोडली. त्यामुळे परिसरातील इमारतीलगत पाण्याचे तळे तयार झाले आहे, तर आजूबाजूच्या लोकवस्तीतील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. आधीच पाण्याचा दुष्काळ असताना नेरळ ग्रामपंचायतीचे जलशुद्धीकरण केंद्रातून आलेले लाखो लीटर पाणी वाया जात असल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत. मध्य रेल्वेने ठेकेदारावर लक्ष न दिल्याने नेरळ पूर्व भागातील जनतेवर पाण्यासाठी भटकंती करण्याची तसेच विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे.कडक उन्हाळा यात पाणी नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले असून नेरळ ग्रामपंचायतीमधील पाणी विभागाचे सर्व कामगार गेले तीन दिवस त्याच ठिकाणी जलवाहिन्या जोडण्याचे काम करीत आहेत. मात्र, मध्य रेल्वेचे कामगार त्या ठिकाणी सतत काम करीत असल्याने जलवाहिनी जोडण्यात अडचणी येत आहेत. याबाबत नेरळ ग्रामपंचायतच्या सदस्यांनी नेरळ रेल्वेस्थानक प्रबंधक एस. आर. मीना यांच्याशी चर्चा केली. उपसरपंचांनी रेल्वेच्या कामामुळे जलवाहिनी तुटल्याने त्यांनीच ती दुरुस्त करावी, अशी मागणी केली.
नेरळ पूर्व भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी पाणी पुरवठा विभाग दिवसभर कामे करीत आहे. लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल. - जान्हवी साळुंखे, सरपंच, नेरळ