अलिबाग - टाटा विद्युत प्रकल्पासाठी शहापूर, मोठे शहापूर, धेरंड गावात शेतकऱ्यांनी एमआयडीसीमार्फत जमीन दिली होती. मात्र, १३ वर्षांनंतरही ना प्रकल्प झाला ना शेतकऱ्यांना लाभ मिळाला. खार बंदिस्ती नसल्याने गेले तीन दिवस उधाण येऊन खाडीतील पाणी येथील ग्रामस्थांच्या घरात घुसत आहे. त्यामुळे शहापूर, धेरंड ग्रामस्थांच्या घरांसह शेतीचेही नुकसान होत आहे.
स्थानिकांच्या या समस्येकडे एमआयडीसी तसेच प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रकल्पाला जमिनी देऊन डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. येथील शेकडो एकर शेतजमीन टाटा विद्युत प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी १३ वर्षांपूर्वी दिली होती. नव्या प्रकल्पामुळे या भागाचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल, अशी आशा होती. एमआयडीसीमार्फत जमीन भूसंपादित करण्यात आली. टाटा वीज प्रकल्पाच्या प्रशासनानेही गावाच्या परिसरात असलेली शेतीची खार बंदिस्ती करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कंपनीने आश्वासन तर पाळले नाहीच उलट प्रकल्पही गुंडाळला.
खाडीमधील उधाणापासून शेतीचा बचाव व्हावा, यासाठी स्थानिक ग्रामस्थ वेळोवेळी स्वखर्चाने बांधबंदिस्ती करत होते. खासगी प्रकल्पाला जमीन दिल्याने खारभूमी विभागही खार बंदिस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. अंधेरी येथील एमआयडीसी कार्यालयात अनेकवेळा गाव कमिटीने जाऊन समस्या मांडली. मात्र, त्यांनीही दुर्लक्ष केले आहे. प्रशासनही ग्रामस्थांची समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहे.
स्थानिकांची नुकसानभरपाईची मागणी सोमवारपासून मोठे उधाण असल्याने आणि गावाची खार बंदिस्ती नसल्याने पाणी घरात, शेततळी, शेतात घुसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून स्थानिक हा त्रास सहन करत आहेत. शेततळ्यात खारे पाणी घुसल्याने तळ्यातील मासेही उधाणात गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. सामानाचे नुकसान झाले आहे. धेरंड गावात ३२०, मोठा शहापूर येथे ४७० तर धाकटी शहापूरला ३७५ घरे आहेत. ८० टक्के घरांमध्ये पाणी घुसले आहे.