पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 01:20 AM2019-11-05T01:20:04+5:302019-11-05T01:20:31+5:30
अस्मानी संकटाने हैराण :आम्ही आता नक्की करायचे तरी काय? शेतकऱ्यांचा करुण प्रश्न
नागोठणे : विभागातील वरवठणे येथील गोकुळ पाटील यांची स्वत:ची ४७ गुंठे जमीन असून पत्नीच्या नावे दुसरी ५५ गुंठे जमीन आहे. दोन्ही शेतांत भाताचे पीक घेतले जाते. पडलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले जवळपास ९० टक्के पीक नष्ट झाले असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. भाताची लागवड करण्यापासून लावणी कापणीसाठी या दोन्ही शेतांसाठी ३० ते ३२ हजार रुपयांचा खर्च आम्हाला येत असतो. ही कामे करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचा सुद्धा हातभार लागत असल्याने सर्व कामांसाठी १०० टक्के मजूर घेतले, तर हाच खर्च काही हजारांनी वाढू शकतो असे त्यांनी सांगितले.
सर्वजण मदत करत असल्याने दरवर्षी दहा ते बारा खंडी भात आमच्या हातात येत असतो. मात्र, पावसाने यावर्षी फक्त दहा टक्के पीक हातात आले असले तरी, तांदूळ पांढºया ऐवजी पिवळ्या रंगाचा होणार असून ते खाण्या योग्य सुध्दा राहणार नाही अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. घरात खाण्यासाठी भात काढून ठेवल्यावर उर्वरित भात दरवर्षी विकून टाकत असतो. व्यापारी बाराशे रुपये क्विंटल दराने भात खरेदी करतात. तर, सोसायटीचे तो विकत घेतला, तर हाच भाव सतराशे रुपये दराने मिळत असतो. या वर्षी भात हातातच येत नसल्याची भीती व्यक्त करताना शेतकºयांनी आता कोणावर भरोसा ठेवायचा, असे त्यांनी उद्विग्नपणे सांगितले. सरकारी अधिकाºयांनी शेतीची पाहणी केली आहे. गतवर्षी झालेल्या शेतीच्या नुकसानीची अद्याप भरपाई मिळालेली नाही अथवा बँकेत सुध्दा पैसे जमा झालेले नाहीत. कृषी खात्याकडून लवकरच पैसे तुमच्या खात्यात जमा होतील असे सांगितले जात असले तरी, ते फक्त आश्वासनच राहिले असल्याचे गोकुळ पाटील यांनी सांगितले.
सुरुवातीला हंगामातील पावसाने पिकाचे नुकसान झाले, त्यातून आम्ही सावरलो... पुन्हा पोटाला चिमटा काढत काम केलं... जोमदार पीक शिवारात डोलताना पाहून बरं वाटलं...मात्र निसर्गानेच आमचा घात के ला...तयार झालेले भाताचे पीक, मागील आठवड्यात पडलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने आमच्या तोंडातून काढून घेतले... या अस्मानी संकटाने वर्षभराची आमची मेहनत वाया गेली... आता खायचे काय?... गुरांच्या पेंढ्याचेही नुकसान झाले... गुरांसाठी कु ठून खाद्य आणायचे?...आम्ही आता नक्की करायचे तरी काय, असा सवाल वरवठणे येथील एक शेतकरी गोकुळ पाटील यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.