ग्रामदैवत धापया महाराज मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:25 AM2019-04-20T00:25:04+5:302019-04-20T00:25:14+5:30
कर्जतकरांचे ग्रामदैवत धापया महाराज यांचा अक्षय्यतृतीयेला उत्सव असतो.
कर्जत : कर्जतकरांचे ग्रामदैवत धापया महाराज यांचा अक्षय्यतृतीयेला उत्सव असतो. दोन दिवस चालणाºया या उत्सवाला भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, अर्धा एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप मंदिराच्या गाभाºयातील पाणी कमी न झाल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कर्जत रेल्वे स्टेशनच्या लगत असलेल्या बाजारपेठेतून शहराच्या मध्यवर्ती भागातून धापया मंदिरच्या बाजूने, बर्फ कारखाना, पोलीस वसाहत, नगरपरिषद कार्यालय, करमरकर वकील यांच्या इमारतीच्या बाजूने उल्हास नदीला मिळालेला मुख्य नाला अनेक वर्षांपासून त्याच जागेतून वाहत आहे. या नाल्यामुळे पावसाळ्यात मंदिराचा गाभारा पाण्याने पूर्णपणे भरलेला असतो. मात्र, उन्हाळ्यात या नाल्याची साफसफाई योग्य पद्धतीने होत असल्याने पाणी त्या ठिकाणी झिरपत नाही. नाल्यातील पाणी वाहत असल्याने दरवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यांत मंदिराच्या गाभाºयातील पाणी आटते. मात्र, यावर्षी एप्रिल महिना अर्धा संपला आहे तरी गाभाºयातील पाणी आटले नाही त्यामुळे भाविक चिंतेत आहेत.
नगरपरिषद प्रशासनाने या मुख्य नाल्याचे बांधकाम हाती घेतले आहे. लोणावळा कन्स्ट्रक्शन कंपनीने या कामाचा ठेका घेतला आहे. बर्फ कारखान्याजवळ नाल्यावर असलेली अरुंद मोरी रुंद करण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, हा नाला माझ्या जागेतून जात आहे असे सांगून अनिल जोशी यांनी त्या मोरीचे काम बंद पाडून आठ दिवसांपूर्वी कर्जत न्यायालयातून कामावर स्टे आॅर्डर घेतली आहे, त्यामुळे सध्या मोरीचे काम बंद आहे.
काही प्रमाणात वाहत असलेला नाला या कामाच्या अडवणुकीमुळे वाहण्याचा बंद झाला आहे. नाल्यात प्रचंड प्रमाणात कचरा अडकून नाल्याचे वाहणे बंद झाले. आज ते पाणी त्याच ठिकाणी जमिनीत झिरपत आहे. नाल्यात पाणी झिरपत असल्याने मंदिराच्या गाभाºयातील पाणी कमी होत नाही. दरम्यानच्या काळात ७ मार्च रोजी या विभागाच्या नगरसेविका मधुरा चंदन यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे व नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांना पत्र देऊन गुजराथी वाडा ते बर्फ कारखान्यापर्यंतच्या नाल्यात पूर्णपणे कचरा पडून वाहण्यास अनुकूल राहिला नाही, त्यामुळे नाल्याचे सांडपाणी आजूबाजूला साचून या परिसरातील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, तसेच ग्रामदेव धापया महाराज मंदिराचा गाभारा पाण्याने भरला आहे याबाबत लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.
>नाल्याचे बांधकाम सुरू होईल तेव्हा होईल. मात्र, नाल्यात साठलेला कचरा नगरपरिषद प्रशासनाने साफ करावा जेणेकरून पाण्याचा निचरा होईल.
- महेंद्र चंदन, अध्यक्ष-धापया देवस्थान समिती
नगरपरिषदेचे सफाई कामगार लावून नाला साफसफाई करण्यात येईल. धापया मंदिर उत्सवास कोणतीही अडचण येणार नाही
- रामदास कोकरे, मुख्याधिकारी, कर्जत नगरपरिषद