काळ पुलावर पाणी, मुंबई-गोवा मार्गावरील वाहतुक बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 03:08 PM2020-08-05T15:08:35+5:302020-08-05T15:10:25+5:30
राज्य महामार्ग विभाग, पोलीस विभागाच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली .
लाेकमत न्यूज नेटवर्क
रायगड : धुवांधार पावसामुळे माणगाव तालुक्यातील घोडनदीवरील कळमजे येथील पुलावरुन पाणी वाहत आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. काळ पुलावर जड वाहनांना प्रतिबंधही करण्यात आला आहे. पुराचे पाणी कमी होईपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील जड वाहनांची वाहतूक थांबविण्यात आली आहे. लहान वाहनांची वाहतूक कोलाड-विळे -निजामपूर-बोरवाडी-डालघर या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. या मार्गावरुन फक्त दिवसा लहान वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी असणार आहे. पर्यायी मार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीस परवानगी नाही.
राज्य महामार्ग विभाग, पोलीस विभागाच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली . गोरेगाव, ता. माणगाव येथे गोरेगाव पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर सोन्याची वाडी नावाचे एक गाव असून काळ नदीच्या पुराच्या पाण्यामुळे या गावाच्या चोहोबाजूंनी पुराचे पाणी आल्याने या गावांमध्ये 70 ते 75 लोक अडकले होते. रायगड पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभाग रायगड यांचे कडील बोटीने त्याठिकाणी अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आत्ता पर्यंत 23 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले असून लोकांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे.
गोरेगाव येथील दत्त मंदिर याठिकाणी या लोकांना सुरक्षितपणे ठेवण्यात आले आहे.