कर्जत : तालुक्यातील पूर्व भाग हिरवागार करणाऱ्या राजनाला कालव्याचे पाणी दुबार शेतीसाठी सोडण्यात आले आहे. मुख्य कालवा, उजवा कालवा आणि पाली पोटल कालव्यामध्ये पाणी सोडले असून, किमान २२०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. राजनाला कालव्याच्या पोटकालव्यात पाणी खळाळू लागल्याने बळीराजा आनंदी दिसत असून, शिवार पुन्हा एकदा हिरवेगार होऊ लागले आहे.हुमगाव ते दहिवली या कालव्याच्या तांबस येथील भागात कालव्याचा तब्बल ४० मीटरचा भाग वाहून गेला होता. त्या कामाची पुन्हा बांधणी करण्यासाठी काढलेल्या निविदांना उशीर झाल्याने शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन पाटबंधारे खात्याच्या यांत्रिकी विभागाने तांबस येथे तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्तीचे काम पूर्ण केले. हुमगाव येथून मुख्य कालव्यातून आलेले पाणी दहिवलीपर्यंत पोहोचावे आणि शेतकºयांना दुबार भाताचे पीक घेता यावे, यासाठी पाटबंधारे विभागाने सर्व तयारी पूर्ण केल्यानंतर पाणी सोडण्यात आले. या उजव्या कालव्यातून तब्बल ३४ गावांतील शेती ओलिताखाली येणार असून, १८०० हेक्टर क्षेत्र त्या भागात आहे. भाताचे पीक मोठ्या प्रमाणात राजनाला कालव्याच्या पाण्यावर घेतले जाते. ही बाब लक्षात घेऊन शेतीला पाणी पोहोचले पाहिजे, यासाठी पाटबंधारे विभागाने कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन पूर्ण केले.टाटाच्या आंध्र धरणातून वीज निर्माण केल्यानंतर खाली सोडले जाणारे पाणी हे पेज नदीमधून वाहत जाते. तेच पाणी पुढे उल्हासनदीद्वारे कल्याणच्या खाडीला जाऊन मिळते. वीजनिर्मिती झाल्यानंतरचे पाणी नदीमध्ये जात असताना त्या ठिकाणी राजनाला कालवा बांधून शेतीसाठी वळविले गेले आहे. ते पाणी ज्या ठिकाणी मुख्य कालव्यातून उजवा, डावा आणि पोटल कालव्यात सोडले जाते. तेथे कालव्यात घातलेला बांध जेसीबीच्या साहाय्याने खोदून पाणी राजनाला कालव्यात सोडण्यात आले. या कालव्यातून पाणी आता शेवटच्या टोकावर असलेल्या कुशिवली, दहिवली भागातील शेतकरी यांच्या शेतात पोहोचले आहे. त्याच वेळी कडावच्या परिसरात तर मोठ्या प्रमाणात पाणी शेतकºयांनी कालव्यातून शेतात घेतले आहे. कालव्यांत सर्वत्र पाणी दिसत असून, शेतदेखील ओली झाली आहेत आणि पुन्हा एकदा हिरवळ उगविण्यास सुरुवात झाली आहे. तर शेतकºयांनी आता भाताची रोपे बनविण्यास सुरुवात केली आहे. भाताची रोपे ही जमिनीवर दिसू लागल्याने शेतात मध्येच हिरवेगार कोंब फुललेले दिसत आहेत.तांबस येथे वाहून गेलेल्या कालव्याच्या भागामुळे काही दिवस उशिरा पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडल्यानंतर आम्ही सर्व कालवे, पोटकालवे, गेट यांची पाहणी केली असून, कुठेही काही अडचण राहिली नाही. पाणी जरी उशिरा सोडले असले तरी नंतर ते उशिरा बंद केले जाईल.- अजय कदम, उपअभियंता, पाटबंधारेआमच्या भागात पाणी पोहोचले असून, आम्ही भातशेतीबरोबर भाजीपाला तसेच कडधान्य शेती करीत असून, कालव्याला पाणी आल्याने या वर्षी भाताचे पीक घेण्यावर सर्वांनी जास्त लक्ष केंद्रित केले आहे. कारण पावसाळ्यात या वर्षी भाताच्या पिकाचे नुकसान झाले होते.- प्रकाश मसणे, शेतकरी, पाली
राजनाला कालव्याला सोडले पाणी; शेतीच्या कामांना जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 12:13 AM