मुरुड जंजिरा : तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत सुमारे २० कोटी रुपये खर्च करून धरण बांधण्यात आले. आंबोली धरणात मोठा पाणीसाठा असूनही धरणाच्या आजूबाजूला दहा कि.मी. परिसरात असणाऱ्या गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवते.
धरणातून कालवे काढण्याची मागणी आमदार पंडित पाटील यांनी अनेकदा शासनाकडे केली आहे. मात्र, निधी उपलब्ध न झाल्याने कालव्यांची कामे रखडली आहेत. पाणीटंचाई दूर करायची असले तर अस्तित्वात असलेल्या कालव्यातून पाणी सोडणे आवश्यक आहे. हे पाणी सोडल्यास ते जमिनीत मुरेल आणि विहिरी व व कूपनलिकांद्वारे नागरिकांना उपलब्ध होईल. त्यामुळे आंबोली धरणातील कालव्यांची कामे व अस्तित्वात असलेल्या कालव्यांमधून पाणी सोडण्याची मागणी शेकापचे तालुका चिटणीस व नगरसेवक मनोज भगत यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आंबोली येथील धरणातील कालव्यांची कामे रखडली आहेत. तसेच मुबलक पाणी असूनसुद्धा पाणी न सोडल्यामुळे या धरणातील आजूबाजूच्या गावात मोठ्या भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
आंबोली धरण हे हेटवणे लघु पाटबंधारे विभाग रायगड याच्या अंतर्गत येते; परंतु या विभागाचे धरणाकडे दुर्लक्ष झाले असून या ठिकाणी अधिकारी वर्ग फिरकतच नाही, त्यामुळे लोकहिताचे निर्णयही घेता आलेले नाहीत. मुबलक पाणीसाठा असताना पाणी न सोडल्याने येथील विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. चरणातील पाणी कालव्याद्वारे सोडल्यास, पाणी आंबोली ते तेलवडे व माझेरी, खोकरी भागापर्यंत उपलब्ध होण्यास मदत होईल. यासाठी लवकरच मुरु ड तहसीलदार यांची भेट घेणार असून धरणाचे पाणी सोडण्याची मागणी करणार असल्याचे नगरसेवक मनोज भगत यांनी सांगितले.