VIDEO: पाणी कंपनीसाठी नागरिकांना नाही, अधिकाऱ्याच्या उत्तराने शेकाप कार्यकर्त्यांचा संताप
By राजेश भोस्तेकर | Published: September 1, 2022 03:03 PM2022-09-01T15:03:48+5:302022-09-01T15:05:53+5:30
एमआयडीसी पाणी हे उसर येथील गेलं कंपनीसाठी आहे नागरिकांसाठी नाही. असे उत्तर शेकापच्या शिष्टमंडळाला अधिकारी यांनी दिले.
अलिबाग :
एमआयडीसी पाणी हे उसर येथील गेलं कंपनीसाठी आहे नागरिकांसाठी नाही. असे उत्तर शेकापच्या शिष्टमंडळाला अधिकारी यांनी दिले. अधिकाऱ्याच्या या उर्मट उत्तराने शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी झेडपी सदस्य संजय पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्यासह कार्यकर्ते यांचा पारा चढला आणि अधिकारी याना चांगलेच फैलावर घेऊन जाब विचारला. यावेळी वातावरण तंग झाले. जोपर्यंत अधिकारी माफी मागत नाही आणि २६ गावांचा पाणी प्रश्न सुटला जात नाही तोपर्यंत जाणार नाही असा पवित्रा शेकाप मोर्चेकरी यांनी घेतली. अखेर जमावाच्या रोषासमोर अधिकारी यांनी नमते घेत माफी मागितली. पाणी पुरवठा त्वरित सुरळीत करतो असे सांगितल्यावर वातावरण शांत झाले. ऐन गणपती काळात २६ गावामध्ये पाणी समस्या निर्माण झाली होती.
अलिबाग तालुक्यातील २६ गावांना ऐन गणेशोत्सव काळात पाणी समस्येला सामोरे जावे लागले आहे. शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील याच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते हे गुरुवारी १ सप्टेंबर रोजी अलिबाग येथील एमआयडीसी कार्यालयात अधिकारी याची भेट घेण्यास आणि पाणी समस्याबाबत चर्चा करण्यास गेले होते. यावेळी अधिकारी याच्या उर्मट उत्तराने मोर्चेकरी हे संतप्त होऊन वातावरण चिघळले होते.
VIDEO: पाणी कंपनीसाठी नागरिकांना नाही, अधिकाऱ्याच्या उत्तराने शेकाप कार्यकर्त्यांचा संताप pic.twitter.com/zMOkW2azvf
— Lokmat (@lokmat) September 1, 2022
अलिबाग तालुक्यातील गेल कंपनीला एमआयडीसी मार्फत पाणी पुरवठा करण्यासाठी पाईप लाईन टाकण्यात आलेली आहे. एमआयडीसीच्या लाईंनवरून त्या हद्दीतील २६ गावांना पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे या गावांना एमआयडीसीचे पाणी मिळते. गेल कंपनीत बांधकामसाठी पाणी आवश्यक असल्याने पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत कंपनीने एमआयडीसीला सांगितले. त्यानुसार एम आय डी सी कडून लाईन चे काम सुरू करण्यात आले. मात्र त्यामुळे गावांना होणारा पाणी पुरवठा बंद झाला. आणि नागरिकांना पाणी मिळणे कठीण झाले. गणपती सण असताना पाणी मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते.
एम आय डी सी मार्फत होणारा पाणी पुरवठा सुरळीत करणेबाबत शेकाप शिष्टमंडळ आणि कार्यकर्ते हे एम आय डी सी कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांच्या कक्षात दाखल झाले. यावेळी पाणी पुरवठा होत नसल्याचे शिष्टमंडळाने म्हटले असता, पाणी हे गेल कंपनी साठी आहे नागरिकांसाठी नाही असे उत्तर ननवरे यांनी दिले. त्यामुळे वातावरण तंग होऊन सर्वांनी अधिकारी यांना धारेवर धरले. यावेळी अधिकारी यांचे मोबाईल, डायरी, पाणी बॉटल, ग्लास हे संतप्त जमावाने फेकून दिले. जमावाचा रोष आणि आरडा ओरड ऐकून कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी धावत आले. त्यानंतर त्यांनी जमावाला शांत करण्यास सुरुवात केली. पोलिसांना बोलावण्याची भाषा अधिकारी यांनी केल्यानंतर बोलवा पोलिसांना असा पावित्रा जमाव कर्त्यानी घेतला.
ननवरे हे बोललेल्या वाक्यावर माफी मागत नाहीत आणि पाणी कधी देणार याचे उत्तर दिल्याशिवाय जाणार नाही असा पवित्रा शेकापने उचलला. कार्यकारी अभियंता यांनी माफी मागितल्यानंतर वातावरण शांत झाले. त्वरित पाणी सुरू करतो असे आश्वासनही देण्यात आले.