माथेरानमध्ये पर्यटन हंगामासाठी पाणी नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:14 PM2019-02-25T23:14:47+5:302019-02-25T23:14:51+5:30
दर बुधवारी होणार पाणीकपात : पाणीटंचाई भासू नये म्हणून उपाय
माथेरान : माथेरान पर्यटनस्थळास येथील शार्लोट लेक येथून पाणीपुरवठा केला जातो, तसेच नेरळ येथूनही माथेरानसाठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे, तरीही ऐन पर्यटन हंगामामध्ये माथेरानकरांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागते, त्यामुळे खबरदारी म्हणून जलप्राधिकरणाने आतापासूनच दर बुधवारी पाणीकपात करण्यास सुरुवात केली आहे. या दिवशी जलवाहिन्या दुरुस्त केल्या जाणार असल्याचे प्राधिकरणाने जाहीर केले आहे.
माथेरान पर्यटननगरीचा पर्यटन हंगाम पुढील महिन्यानंतर सुरू होणार आहे. जूनअखेरपर्यंत चालणारा हा पर्यटन हंगाम माथेरानमधील सर्वात मोठा पर्यटन हंगाम असतो. दरवर्षी येथे मे महिन्याच्या अखेरीस पाणीटंचाईस सुरुवात होते. पूर्वी येथील शार्लोट लेक येथून संपूर्ण माथेरानला पाणीपुरवठा केला जात असे. मात्र, दिवसेंदिवस वाढत असलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे माथेरानकरांना पाणीटंचाई जाणवू लागल्याने येथे माजी आमदार सुमंतराव राऊत यांच्या आमदार निधीतून नेरळ येथील उल्हासनदीतून जलवाहिन्यांद्वारे पाणी माथेरानकरिता नेण्यात आले, त्यामुळे काही वर्षे माथेरानकरांनी सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र, या वाहिन्या जुन्या झाल्यानंतर नेरळ-माथेरान घाटामध्ये वाहिन्या फोडण्याचे प्रमाण वाढल्याने माथेरानकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईस सामोरे जावे लागले होते, तेव्हा तत्कालीन नगराध्यक्ष अजय सावंत यांच्या प्रयत्नातून माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी शून्य अनुदानातून माथेरानसाठी नवीन पाणीपुरवठा योजना आणली. त्यामुळे येथील पाणीप्रश्न सुटला होता.
मात्र, मे महिन्याच्या गर्मीमध्ये शार्लोट लेकची खाली जाणारी पातळी व विजेच्या कमतरतेमुळे वारंवार खंडित होणारी पम्पिंग यामुळे येथे ऐन पर्यटन हंगामामध्ये माथेरानकरांना पाणीटंचाई जाणवू नये, म्हणून जलप्राधिकरणाने आतापासून खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आठवड्यातून एक दिवस बुधवारी पाणीकपात करण्यास सुरुवात केली असून, त्याचे माथेरानकरांनीही स्वागत केले आहे.