उरण रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गातील पाणी समस्या कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 05:52 PM2023-08-29T17:52:32+5:302023-08-29T17:53:30+5:30
खारकोपर ते उरण ही बहुप्रतिक्षित लोकल सुरू होण्यापूर्वीच उरणच्या स्थानकाच्या भुयारी मार्गात पावसामुळे पाणी साचू लागले आहे.
उरण : उरण खारकोपर दरम्यानची लोकल सुरू होण्यापूर्वीच उरण स्थानकांच्या भुयारी मार्गात पाणी साचू लागले आहे. हे भुयारी मार्गच बंद आहे. त्यामुळे उरण स्थानकांच्या भुयारी मार्गातील पाणी समस्या कायम आहे.
खारकोपर ते उरण ही बहुप्रतिक्षित लोकल सुरू होण्यापूर्वीच उरणच्या स्थानकाच्या भुयारी मार्गात पावसामुळे पाणी साचू लागले आहे. त्यामुळे ही लोकल सुरू होण्यापूर्वीच या मार्गावरील स्थानकांच्या कामांची पोलखोल झाली आहे. खाडी परिसरात असलेल्या या स्थानकात भुयारी फलाट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचे व समुद्राच्या भरतीचे पाणी स्थानकांच्या भुयारी मार्गात येऊ लागले असल्याचे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
उरणमधील तरुणांनी स्थानकात साचलेल्या या पाण्यात डुंबून पोहण्याचा आनंद घेतला होता.या क्षणाचे चित्रण इलेक्ट्रॉनिक मीडियाने प्रसारित करुन कामाची पोलखोल केली होती.हे प्रसारण दिल्ली दरबारापर्यत पोहचल्याने पीएमओ विभागाने या प्रसारणाची दखल घेतली गेली आहे.या रेल्वे मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते उद्घाटन करण्यात यावे यासाठी रेल्वे प्रशासन, खासदार, आमदारांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी पीएमओकडूनच अद्यापही ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याने तुर्तास तरी उद्घाटन रखडलेले आहे.
उरण पर्यंत लोकल सुरू होण्याची येथील नागरीक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच यासाठी तारीख पे तारीख ही जाहीर झाल्या आहेत. त्याचवेळी पहिल्याच पावसात नव्याने उभारण्यात आलेल्या स्थानकांत चार ते पाच फूट पाणी साचल्याने पावसाळ्यात या स्थानकांची स्थिती काय असणार याचे भविष्यच दिसू लागले आहे.पावसाचे पाणी भुयारी मार्गात साचू लागल्याने या स्थानकातील दोन्ही भुयारी मार्ग लोखंडी बार लावून भुयारी मार्गच बंद करण्यात आले आहेत. तसेच पाणी उपसा करण्यासाठी कायमस्वरूपी पंपही बसविण्यात आले आहेत.