आगरदांडा : गेली १० वर्षे मिठागर, खामदे गावाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. अनेक वेळा तक्रार करूनही याकडे कोणीही लक्ष देत नाही, यामुळे मुरुड तहसीलदार कार्यालयात येत्या २७ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सावली ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच मंदा ठाकूर पाणीप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी चौथ्यांदा आमरण उपोषणास बसणार आहेत. याबाबतचे रीतसर निवेदन मुरुड तहसीलदार परीक्षित पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.
२००९-२०१० साली ग्रुप ग्रामपंचायत सावलीमध्ये भारत निर्माण अंतर्गत मिठागर, सावली व खामदे येथे नळ पाणीपुरवठा योजना व २०११-२०१२ मध्ये मिठागर येथे आणखी राष्ट्रीय पेय जल योजना राबविण्यात आली. पहिल्या योजनेसाठी ७५ लाख व दुसऱ्या योजनेसाठी ५० लाख निधी मंजूर करून एकूण १ कोटी २५ लाख या योजनांवर खर्च झालेले आहेत,परंतु या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाइप वापरण्यात आले. त्यामुळे अद्यापपर्यंत नऊ वर्षे पूर्ण होऊन सुद्धा गावामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा ग्रामस्थांना पिण्याकरिता मिळालेला नाही. तथापि या प्रकरणांत भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत मुरुड तहसीलदार कार्यालयाजवळ १८ एप्रिल२०१७, ५ एप्रिल २०१८, १ मे २०१९ असे तीन वेळा उपोषण केले होते. यावेळी शासनमार्फत तीन लेखी आश्वासने दिली होती. त्याची जवळजवळ चार वर्षे होऊन सुद्धा शासन दरबारी अद्यापपर्यंत कोणतीही पूर्तता अथवा त्याबाबत कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही.
याबाबत शासनाला स्मरणपत्र देखील दिले होते, परंतु शासनाकडून मिठागर, खामदे, सावली नळ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात कोणतीही दखल घेतलेली नाही. तसेच पाणीपुरवठा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीबाबत शासनाचे उदासीन धोरण असल्याचे प्रभारी सरपंच मंदा ठाकूर यांनी ग्रामस्थ महिलांच्या वेळोवेळी निदर्शनास आणले आहे. शासनाने आमच्या उपोषणाची व सत्याग्रहाच्या मार्गाची चेष्टा मांडली आहे. हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. जोपर्यंत शासन ठोस निर्णय घेत नाहीतर येत्या २७ मे २०१९ रोजी मुरुड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरूकरणार हे उपोषण शेवटचे असणार असा इशारा प्रभारी सरपंच मंदा ठाकूर यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.
ज्या वेळी मंदा ठाकूर उपोषणास बसल्या होत्या त्यावेळी कार्यरत असणारे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी २८ डिसेंबर २०१८ रोजीच्या पत्रान्वये महाड येथील उपअभियंता जे.एन.पाटील,यांना येथे झालेल्या कामात भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.परंतु या प्रकरणाची चौकशीच झाली नाही.त्यामुळे भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्याने मंदा ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता प्रशांत म्हात्रे यांनी पत्र देऊन १५ दिवसात मिठागर गावाला पाण्याचे आश्वासन दिले होते,परंतु पूर्तता न झाल्याने पुन्हा ठाकूर यांना उपोषणास बसावे लागत असल्याचे निवेदनात नमूद के ले आहे.किंजळोली बुद्रुक बौद्धवाडी पाण्यापासून वंचितमहाड : खासगी मालकीच्या जागेत असलेली सार्वजनिक बोअरवेल जागा मालकाने बंद केल्याने किंजळोली बुद्रुक बौद्धवाडीला पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. ही बोअरवेल त्वरित खुली करावी, अन्यथा २३ मेपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा या बौद्धवाडीतील रहिवाशांनी दिला आहे.च्किंजळोली बुद्रुक बौद्धवाडीत गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाई आहे. या वाडीमध्ये एक सार्वजनिक बोअरवेल आहे. या बोअरवेलमध्ये पाण्याची उपलब्धता देखील आहे. मात्र ही बोअरवेल खासगी जागेत असल्याने जागा मालकाने या बोअरवेलमधून पाणी घेण्यास हरकत घेत, ही बोअरवेल बंद केली आहे. त्यामुळे या वाडीतील पंधरा कुटुंबांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
च्पाण्यावाचून या वाडीतील रहिवाशांचे आणि आबालवृद्धांचे अतोनात हाल होत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही, ग्रामपंचायतीने त्या तक्रारीची दखल घेतलेली नाही. ही बोअरवेल त्वरित खुली करून देण्यात यावी, या जागा मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा, २३ मेपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे.