उरण : उरण तालुक्यातील रानसई आदिवासी वाडीत डीपीवर्ल्ड टर्मिनल प्रशासनाने सीआरएस फंडातून जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (४) झाले.उरण तालुक्यातील रानसई येथील खैरकाठीवाडी, भुऱ्याचीवाडी, बंगल्याचीवाडी, मार्गाचीवाडी, कोंड्याचीवाडी, सागाचीवाडी अशा सहा आदिवासी वाड्यांतील अनेक पाण्याच्या शासकीय योजना आत्तापर्यंत बारगळल्या आहेत. डीपी वर्ल्ड कंपनीने जलशुद्धीकरण प्रकल्पाची निर्मिती करून पाण्याचा प्रश्न सोडवला आहे.
उरण तालुका अतिशय विकसित आहे, असं सगळ्यांना वाटत आहे. मात्र, या तालुक्यातही आदिवासींना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांच्यासाठी डीपी वर्ल्ड टर्मिनलने जलशुद्धीकरण प्रकल्पाची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, माजी आमदार मनोहर भोईर, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, इंटकचे राष्ट्रीय सचिव कामगार नेते महेंद्र घरत, डीपी वर्ल्डच्या सीईओ श्रद्धा गोळे, श्री सुब्रमण्यम, उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, गटविकास अधिकारी नीलिमा गाडे आदी उपस्थित होते.
रस्ता दुरुस्त करणार येथे येत असताना रस्त्याची अवस्था पाहिली. या आदिवासींना पक्क्या रस्त्याची निर्मिती करणे क्रमप्राप्त असून, आघाडी सरकारच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदनार्शखाली या रानसई आदिवासींचा रस्ता योग्यतेने बनविणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिले.