- अरूण जंगमम्हसळा : ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत म्हसळा तालुक्यातील नऊ गावांसाठी ६ कोटी १८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात संबंधित गावांचा पाणीप्रश्न निकाली निघण्याची चिन्हे आहेत.तालुक्यात एकूण ८४ गावे वसलेली असून अंदाजे लोकसंख्या ५० हजारांच्या घरात आहे. तुरुंबाडा, काळसुरी, गोंडघर मोहल्ला, सुरई मोहल्ला, खारगाव(बुद्रुक), मांदाटणे, केल्टेबा उलकोंड, सोनघर, रेवली, वाडांबा, कोंझरी, ठाकरोली, पानवे, वावे गावांना ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजनेचा फायदा होणार आहे.तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी कायमस्वरूपीच्या जलसाठ्यांचा अभाव आहे. तलाव, बंधारे यांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य आहेत. तालुक्यात पाणीपुरवठ्यासाठी कोट्यवधींचे प्रकल्प प्रस्तावित असले तरी त्यांची कामे प्रलंबित आहेत. याचा फटका तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना बसत असून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील वातावरण शेतीस पूरक असले तरी कायमस्वरूपी जलस्रोतांच्या कमतरतेमुळे शेतीउत्पादनाला फटका बसत आहे.म्हसळा तालुक्यात यंदा उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. या समस्येवर ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून स्थानिकांच्या व्यथा मांडल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसात संबंधित गावांमध्ये बोअरवेल करण्यात आल्या होत्या.म्हसळेतील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. त्याचप्रमाणे दिवेआगार येथील सुवर्णगणेश मंदिरालाही ऐतिहासिक महत्त्व आहे. येथील दिघी बंदराचाही झपाट्याने विकास होत असल्याने वाहतूक वाढली आहे.असे असले तरी पाण्यासाठी स्थानिकांना वणवण करावी लागते. आता तालुक्यात राष्टÑीय पेयजल योजनेंतर्गत ६ कोटी १८ लाखांचा निधी मंजूर झाल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. आता या योजनेंतर्गत होणारी कामे लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.
म्हसळेतील गावांचा पाणीप्रश्न निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 3:25 AM