- गणेश प्रभाळे दिघी : रोजगारनिर्मितीसाठी पर्यटनाच्या जोडीला औद्योगीकरणाची भर पडत आहे. येथे नेहमी पर्यटनाने गजबजलेल्या म्हसळा शहराची ओळख आहे. मात्र, पुणे-दिघी महामार्गालगत असणाऱ्या म्हसळा तालुक्यातील मेंदडी आदिवासीवाडीला गेली दोन वर्षे शासनाच्या अनास्थेपायी पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते.
विकसित तालुका म्हणून ओळख पुढे येत असली, तरी पाण्याच्या समस्येला येथील नागरिक त्रासल्याने ‘लोकमत’ने या समस्येला वाचा फोडली होती. १८ जानेवारी रोजी ‘मेंदडी आदिवासीवाडी तहानलेली’ अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध के ले होते. या वृत्ताची दखल घेऊन पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून नव्याने बोअरवेल बसवून मुबलक पाण्याची सोय करण्यात आली आहे.
दिघी-पुणे निर्मिती होत असलेल्या मार्गावर हे गाव आहे. एकीकडे झपाट्याने म्हसळा परिसरातील सुविधायुक्त शहराची होत असलेली उभारणी बहुचर्चित आहे. या ठिकाणापासून म्हसळा-दिघी मार्गावर एक किलोमीटरच्या अंतरावर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मेंदडी आदिवासीवाडीवर साधारण ८० कुटुंबांतील ३४० लोक राहतात.
पाण्याची सुविधा सर्वत्र होत असतानाही मेंदडी आदिवासीवाडीवर अद्यापही पाणी आले नव्हते. परिणामी, येथील आदिवासी पाण्यासाठी मैलोन्मैल वणवण फिरत होते. त्यांच्या या मागणीकडे दीड- दोन वर्षांमध्ये फारसे कोणीही लक्ष दिले नाही. आदिवासींसाठी सरकारने स्वतंत्र विभाग सुरू केला असताना प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत सरकारच्या काहीच सुविधा पोहोचत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात होता.
तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी येथील प्रशासनाकडून लाखो रुपयांच्या योजना राबवण्यात येतात. मात्र, या आदिवासीवाडीशेजारी एक किलोमीटर अंतरावर धरण असून, या धरणाचे पाणी आदिवासी बांधवांना मिळत नसल्याने पाणी योजनेची मागणी होऊनसुद्धा येथील नागरिक पाण्यावाचून तहानलेले होते.
ग्रामस्थांना रानातील झºयातून पाणी प्यावे लागायचे. प्रशासनाच्या तत्परतेचा अभावामुळे मेंदडी आदिवासीवाडीवरील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. डोंगर माथ्यावरून पाण्यासाठी ये-जा करावी लागत असल्याने लवकरात लवकर पाण्याची सुविधा करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली असता ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच येथील पाणीप्रश्न वेळेत सोडवण्यात आला.
‘लोकमत’चे आभार
गेल्या दीड वर्षापासून गावात पिण्यासाठी पाणी नव्हते. पाणीसमस्येमुळे आम्हा ग्रामस्थांना वणवण भटकंती करीत, पाणी आणण्यात दिवस जायचा, त्यामुळे मजुरी बुडायची. परिणामी, ‘लोकमत’च्या वृत्त प्रसिद्धी व सततच्या पुढाकाराने आम्हा ग्रामस्थांचा पाणीप्रश्न सुटला आहे. याबाबत ‘लोकमत’चे मेंदडी आदिवासी बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत.- जाण्या धर्मा वाघमारे, माजी अध्यक्ष, आदिवासी समाज, मेंदडी.
मेंदडी आदिवासीवाडीवर नव्याने बोअरवेल बसवण्यात आली आहे. या बोअरवेलने मुबलक पाणी मिळणार असून, येथील पाणीसमस्या यापुढे कायमस्वरूपी दूर होणार आहे.- वाय. एम. प्रभे, गटविकास अधिकारी, म्हसळा.
सार्वजनिक विहीर कोरडी असून स्वदेश फाउंडेशनने बांधण्यात आलेली बोअरवेल बंद आहे. दुसरी कोणतीच नळ योजना नसल्याने पाणी नव्हते.