पाच ग्रामपंचायतींमध्ये पाणीटंचाई

By admin | Published: September 2, 2016 03:42 AM2016-09-02T03:42:13+5:302016-09-02T03:42:13+5:30

लिबाग तालुक्यातील सारळ, रेवसगांव, मिळकतखार, कोप्रोली आणि डावली रांजणखार या पाच ग्रामपंचायतींमधील जनतेला पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे

Water scarcity in 5 Gram Panchayats | पाच ग्रामपंचायतींमध्ये पाणीटंचाई

पाच ग्रामपंचायतींमध्ये पाणीटंचाई

Next

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील सारळ, रेवसगांव, मिळकतखार, कोप्रोली आणि डावली रांजणखार या पाच ग्रामपंचायतींमधील जनतेला पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सद्यस्थितीत ऐन पावसाळ््यात गणेशोत्सवाचा सण तोंडावर आलेला असताना या पाच ग्रामपंचायत क्षेत्रांतील सुमारे पाच हजार कुटुंबे पिण्याच्या पाण्यास वंचित असल्याचे वास्तव फुफादेवी-सारळ येथील शशिकांत आत्माराम पाटील, दोन ग्रामपंचायती आणि ११० ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे तक्रार निवेदन रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यावर समोर आले आहे.
पिण्याचे पाणी पुरवण्याकरिता रायगड जिल्हा परिषदेच्या नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत गेल्या १५ ते २० वर्षांत तब्बल ११ साठवण टाक्या लाखो रुपये खर्चून बांधण्यात आल्या. टाक्या बांधणाऱ्या कंत्राटदारांना त्यांनी केलेल्या कामांची बिले देखील अदा करण्यात आली. परंतु या पाणी साठवण टाक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा एकही थेंब साठवला गेला नाही. परिणामी ग्रामस्थांना पिण्याचे पाणीच मिळाले नाही.
यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊ स समाधानकारक असून सर्व धरणे भरली आहेत. परंतु या परिसरातील या पाच ग्रामपंचायती पिण्याच्या पाण्यावाचून वंचित आहेत. गेल्या १० ते १५ वर्षांपासून ही समस्या असताना कोणीही लोकप्रतिनिधी वा शासकीय यंत्रणा या समस्येवर उपाययोजना काढत नसल्याचे पाटील यांनी सांगितले. ग्रामपंचायतीकडे पाण्याची तक्रार केली तर, ते म्हणतात ग्रामस्थ पाणीपट्टी भरत नाहीत, म्हणून पाणी नाही. मात्र प्रत्यक्षात ग्रामस्थांना पिण्याचे पाणीच मिळत नाही, तर पाणीपट्टी कशी भरायची असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे. या सर्व ग्रामपंचायती समुद्रकिनारी आहेत. त्यामुळे विहिरी व बोअरवेलला खारे पाणी लागते. या ग्रामपंचायतींना एमआयडीसीच्या पाण्याशिवाय पर्याय नाही, हे अनेक निवेदने व मोर्चे काढून शासनाला सांगितले असताना ही कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे पाटील यांनी सांगितले. पाच ग्रामपंचायतीसाठी शासनाने अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत, टाक्या बांधल्या, पाइपलाइन टाकल्या. परंतु आजपर्र्यंत या टाक्यांत पाण्याचा एक थेंब आलेला नाही. या पाणीपुरवठा योजनांचे उद्घाटन सुध्दा झाले नाही. या टाक्यात पाणीच गेले नसल्यामुळे, टाक्यांना तडे जाऊ न त्या धोकादायक अवस्थेत आहेत. जर त्या पडल्या तर मनुष्यहानी होऊ शकते. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी विनंती पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

पाणी घ्यावे लागते विकत : सद्यस्थितीत ग्रामस्थ पाणी विकत घेऊ न पीत आहोत. परिणामी ग्रामस्थांमध्ये कमालीची नाराजी व संताप आहे. पाच ग्रामपंचायतीमध्ये शासनाचे करोडो रुपये खर्च होऊ न सुध्दा एकही पाणीपुरवठा योजना चालू नाही. या बाबतीत मिळकतखार सरपंचाच्या नेतृत्वाखाली नुकताच एक मोर्चा अलिबाग पंचायत समितीवर काढण्यात आला होता, याचीही आठवण पाटील यांनी करुन दिली आहे.

एमआयडीसीचे पाणी हाच होवू शकतो जलस्रोत
सारळ, रेवसगांव, मिळकतखार, कोप्रोली आणि डावली रांजणखार या पाच ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. येथे पिण्याच्या पाण्याचा स्रोत हा एमआयडीसीच्याच पाण्याला जोडणे आवश्यक आहे.
निर्णय वरिष्ठ पातळीवरुन होणे अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. ग्रामस्थांचे निवेदन कार्यवाहीकरिता जिल्हा परिषदेकडे पाठविले असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: Water scarcity in 5 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.