पेण : पेण पंचायत समिती प्रशासनाने पेण ग्रामीण विभागातील टंचाईग्रस्त ५३ गावे, १२६ वाड्यांवर टँकर व बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर विंधन विहिरी घेण्यासाठी १० गावे ५३ वाड्यांसाठी ४६ लाख रुपयांची तरतूद असे मिळून एकूण १ कोटी ३६ लाख रुपयांचा सन २०२०-२०२१ या वर्षासाठी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला आहे.
पेण पंचायत समितीच्या प्रशासनाने टंचाई निवारणार्थ उपाययोजना केल्या असल्याचे गटविकास अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. मात्र वाशी खारेपाटसह वडखळ विभागातील गावांना कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठ्यामुळे टँकर कधी उपलब्ध होणार याकडे महिलावर्गाचे लक्ष केंद्रित झाले आहे. पंचायत समिती प्रशासनाने टंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणून सादर केलेल्या टंचाई कृती आराखड्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. खारेपाटातील शेवटच्या टोकावर असलेल्या गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची सोय तातडीने करणे गरजेचे आहे.
नागरिकांवर पाणी द्या, पाणी द्या असा टाहो फोडण्याची वेळ आली आहे. चार दिवसांनी होणारा पाणीपुरवठा अपेक्षेप्रमाणे कमी मिळतो आहे. प्रत्येक गावात वेळापत्रकानुसार पाणी देण्यासाठी कर्मचारी आहेत, पण नळाला मोटार पंप लावूनदेखील पाणी येत नसल्याने करायचे काय म्हणून महिलावर्गाकडून प्रशासकीय यंत्रणेला दोषी ठरवले जाते, पण प्रशासकीय यंत्रणा करून तरी करणार काय यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करणे.
आता कृती आराखडा मंजूर करण्यात येऊन सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. प्रत्येक दिवसागणिक गावा, गावातील, पाणीटंचाईची तीव्रता वाढत जाणार आहे. यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पेणमधील टंचाईग्रस्त गावांना लवकरात लवकर पाणीपुरवठा करण्यासाठी पेण पंचायत समिती प्रशासनाकडे टँकर पाठविण्यासाठी व्यवस्था करावी, अशी जनतेची व महिलावर्गाकडून जोरदार मागणी केली जात आहे.