अरुण जंगम/कांता हाबळे म्हसळा : सध्या राज्यात पाण्याचा दुष्काळ सर्वत्र जाणवत असून, हजारो गावांना टँकरमार्फत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची वेळ आली आहे. कोकण परिसरातसुद्धा पाण्यासाठी वणवण करणारी गावे अद्याप ऐन उन्हाळ्यात दुष्काळग्रस्त जीवन जगत आहेत. रायगड जिल्ह्यातील नांदवी परिसरातील मढेगाव हे गाव अपवाद म्हणावे लागेल. म्हसळा-गोरेगाव रस्त्यावर असलेले हे आदर्श तंटामुक्त गावातील गावकरी आज पाण्याच्या शोधात भटकंती करीत आहे. गावाला उपलब्ध झालेली ६० लाख रुपयांची नळपाणी योजना काही कारणास्तव गेल्या तीन वर्षांपासून बंद झाल्याने या गावावर दुष्काळाचे सावट पसरलेले आहे. गावातील नागरिक गावाच्या आजूबाजूला खड्डे खोदून पाण्याच्या अपेक्षेत आहेत; परंतु पाण्याचा थेंबही अद्याप या खोदकाम केलेल्या खड्ड्यात लागलेला नसून गावकरी या दुष्काळामुळे हैराण झाले आहेत.
गावाजवळ असलेल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाºया विहिरीसुद्धा आटल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मढेगाव गावाला पाण्याची टंचाई जाणवत असून महिलांना दोन ते अडीच किमी अंतरावरून पाण्यासाठी पायी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे अतिशय भीषण टंचाईग्रस्त अवस्था झालेल्या या गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी जोर धरू लागली आहे.
गावात ६० लाख रुपयांच्या पाण्याची योजना गेले तीन वर्षे झाली; परंतु ही योजना लोकांपर्यंत फक्त आशेचे किरण बनून राहिली आहे. गावातीलच भ्रष्ट लोकांमुळे या योजनेचे १२ वाजले. पाणी कमिटीचे अध्यक्ष मात्र मजेत आहेत आणि गावातील लोक जवळच असलेल्या पावसाळी वाहणाऱ्या नदीकिनारी खड्डे खोदून पाणी शोधत आहेत; पण पाणी काही सापडेना. तरी या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे व वेळेत या गावासाठी ठोस उपाययोजना राबवावी. - साजन पवार, स्थानिक नागरिक
बोंंडेशेत भागात बोअरवेल, विहिरी कोरड्या महिलांना चढाव चढून आणावे लागते पाणीकर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीतील बोंंडेशेत व परिसरातील आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. विहिरी कोरड्या पडल्या असून बोअरवेलला देखील पाणी कमी येत असल्याने तासन्तास पाण्यासाठी ताटकळत बसावे लागत आहेत. तसेच ७०० मीटर चढाव चढून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत असल्याने महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कर्जत तालुक्यासह अनेक भागांत पाणीटंचाईचा सामना महिलांना करावा लागत आहे. तालुक्यातील बोंंडेशेत वाडीमध्ये विहिरी कोरड्या पडल्या असून बोअरवेलला देखील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे महिलांना रात्री उशिरापर्यंत लाइनमध्ये राहून बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे. तसेच ते पाणी देखील ५०० ते ७०० मीटरचा चढाव चढून आणावे लागत आहे. याचा महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र लोकप्रतिनिधींनी आणि शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
दोन वर्षांपूर्वी येथील आदिवासी बांधवांनी लोकवर्गणी काढून नदीपर्यंत पाइपलाइन टाकली आहे. टाकी देखील बांधण्यात आली आहे; परंतु पैसे कमी पडल्याने हे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे वाडीपर्र्यंत पाणी येऊ शकले नाही. तरी शासनाने आमच्या कडे लक्ष देऊन पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी आदिवासी बांधव करत आहेत.
बोंंडेशेत वाडीत विहीर आटली असून बोअरवेलला देखील कमी पाणी येत असल्याने महिलांना तासन्तास उभे राहून७०० मीटरचा चढाव चढून पाणी आणावे लागत आहे. तरी शासनाने आम्हाला पाण्याची सोय करून द्यावी अशी आमची मागणी आहे. - कमळू थोराड, ग्रामस्थ, बोंंडेशेत