रोहा तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट
By admin | Published: March 19, 2017 05:36 AM2017-03-19T05:36:31+5:302017-03-19T05:36:31+5:30
रोहा तालुक्यात दरवर्षी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत येथील बहुतांश भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी सामना करावा लागतो. पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे
रोहा : रोहा तालुक्यात दरवर्षी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत येथील बहुतांश भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी सामना करावा लागतो. पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल होत असतात. तीव्र उष्णतेमुळे तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट कोसळत असल्याने या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीटंचाईग्रस्त गाव व वाड्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून संभाव्य पाणीटंचाई निवारण कृती मूळ आराखडा तयार केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा आराखडा प्रस्ताव मंजुरीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. मात्र, पुढील कार्यवाही अद्याप प्रलंबित असल्याने यंदाच्या संभाव्य पाणीटंचाई आराखडा प्रस्तावावर शासनाकडून पाणी तर फिरणार नाही ना? अशी भीती टंचाईग्रस्त भागातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.
रोहा तालुक्यात उन्हाळी पाणीटंचाईची झळ आतापासून बसू लागली आहे. उन्हाळ्यात नगरपालिका हद्दीत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, तर शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या अनेक भागांत २ ते ३ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने भयानक दृश्य दिसून येत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. निवडणुकीत आश्वासनांची बरसात करणारे पुढारी मात्र पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या महिलांची पाणीसमस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. डोंगर दुर्गम भागात राहणाऱ्या महिला सार्वजनिक विहिरींचा वापर करताना दिसतात, तर काही जण कुंडलिकानदी व कालवा भागातून वाहनाद्वारे (बैलगाडी) ग्रामीण भागात पाणीपुरवठा करीत असल्याचे दृश्य रोह्यात दिसून येत आहे.
रोहे तालुक्यात मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत संभाव्य पाणीटंचाई निवारण कृती मूळ आराखडा गोषवारा तयार असून, तालुक्यातील (उसर) ठाकूरवाडी, (पिंगळसई) साळवी वाडा, (वरवडे) बौद्धवाडी, सोनगाव, धामणसई, गावठाण, (धामणसई) बौद्धवाडी, (भालगाव) फणसवाडी अशी एकूण ३ गावे व ५ वाड्यांवर असणाऱ्या २३८१ लोकांकरिता टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. याकरिता अंतर्गत ४ लाख ८० हजार खर्च होणार आहे. या संभाव्य पाणीटंचाई संदर्भात रोहा पंचायत समिती कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांना अद्याप वेळ मिळत नसल्याने या प्रस्तावाची फाइल पुढे सरकत नाही. दरवर्षी येथील दुर्गम भागांना पंचायत समितीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असतो. अर्थातच, किमान जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांतच याकामाचे आदेश प्राप्त होत असतात; परंतु जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींमुळे यंदा या कामाला उशीर झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आदेश येताच नियोजित गावे व वाड्यांना पाणी देण्यात येईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. (वार्ताहर)
पाणीटंचाई कृ ती आराखडा सादर के ला आहे. आता पाहणी अहवाल देणे आहे. सध्या तरी उसर ठाकू रवाडी येथे भीषण पाणीटंचाई आहे. तेथे हातपंप देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढे एप्रिलमध्ये परिस्थिती पाहून पुरवणी आराखडा सादर के ला जाईल. जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानंतर रोहा तहसीलदारांनी उपलब्ध करून दिलेल्या टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात येईल.
- बी. टी. जायेभाये,
गटविकास अधिकारी, रोहा