महाड तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट; ३० गावे, १३३ वाड्यांना बसणार झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 01:17 AM2021-03-23T01:17:27+5:302021-03-23T01:17:59+5:30
महिलांची पाण्यासाठी वणवण; योजना फेल
सिकंदर अनवारे
दासगाव : उन्हाळा आल्याने महाड तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. आजही तालुक्यात अनेक गावे अशी आहेत की गेली अनेक वर्षांपासून यांची पाणीटंचाई समस्या दूर झालेली नाही. पाणी मनुष्याच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा घटक असल्याने ग्रामीण भागातील महिलांना आपले कामधंदे टाकून पाण्यासाठी आजही वणवण फिरावे लागत आहे.
शासनाकडून पाणीटंचाई दूर करण्यासाठी अनेक योजना राबविल्या असल्या तरी त्या आज काही निकामी ठरल्याच्या दिसून येत आहेत.
यंदाच्या महाड पंचायत समितीच्या सर्व्हेनुसार जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या अहवालानुसार महाड तालुक्यातील ३० गावे आणि १३३ वाड्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार आहे.
राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाकडून तालुक्यांमध्ये विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या असल्या, तरीही अनेक गावे आणि वाड्यांतून पाणी टचांई कमी झालेली नाही. महाड पंचायत समितीने स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक यांच्याकडून घेतलेल्या माहितीवरून तालुक्यांतील ३० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत कमी झाले आहेत, त्यामुळे पुढील महिन्यापासून या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील १३३ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. २०१९-२० च्या पाणी टंचाई निवारण आराखड्यांमध्ये १२ गावे, ८२ वाड्यांतून पाणीटंचाई निर्माण झाली होती, त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ९ टँकरची सोय करण्यात आली होती; परंतु यावर्षी पाणी टंचाईची भीषणता वाढली आहे.
तालुक्यातील सापेतर्फे गोवेले, पिंपळकोंड, फाळकेवाडी, ताम्हाणे, आढी गाव, घुरुपकोंड, शेवते, वाकी गावठाण, मूळगाव गवळवाडी, साकडी, पाचाड गाव या ठिकाणी दरवर्षी पुरेसा पाऊस पडूनही पाणी टंचाई निर्माण होत असल्याचे आढळून येते. तालुक्यांमध्ये अनेक गावांतून बंधारे बांधण्यात आले आहेत. नदी-नाल्यांतून पाणी साठविण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून योजना राबविण्यात आल्या; परंतु पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे दरवर्षी पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचे पाचाडचे माजी सरपंच रघुवीर देशमुख यांनी सांगितले.
नियमित पाणीपुरवठा नाही
किल्ले रायगडच्या परिसरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ पाण्याच्या टंचाईला सामोरे जात आहेत; परंतु अद्याप अनेक गावे तहानलेली असल्याचे दिसून येते. ज्या वाड्या डोंगर कपारीमध्ये आहेत, त्याचबरोबर दुर्गम भागांमध्ये आहेत त्या वाड्यांतून पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी असताना लोकप्रतिनिधी आणि प्रसासनाकडून कायम दुर्लक्ष करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून टंचाईग्रस्त वाड्यांतील महिला डोक्यावरून पाण्याचे हंडे वाहून नेत असताना प्रशासनाकडून पाणीटंचाईच्या काळामध्ये टँकरने जरी पाण्याचा पुरवठा केला जात असला तरी नियमित पाणी पुरविण्यात येत नसल्याची तक्रार सांदोशी परिसरांतील महिला करत आहेत. तालुक्यांतील टंचाईग्रस्त ग्रामपंचायतीने आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन महाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांनी केले आहे.
पाण्याच्या योजनांवर कोट्यवधींचा खर्च
शासनाकडून पाण्याच्या योजनांवर कोट्यवधी रुपये तालुक्यात खर्च केले जात असले तरी पाण्याची समस्या योग्य नियोजनाअभावी दिवसेंदिवस गंभीरच होत आहे. शासनदेखील त्याच योजनांची केवळ नावे बदलून नव्या योजनांवर करोडो रुपये पाण्यात घालवत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा आजही ग्रामीण भागात दिसून येत आहे.