कर्जत तालुक्यातील आदिवासी, दुर्गम भागात पाण्याचे दुर्भिक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 12:15 AM2021-04-04T00:15:24+5:302021-04-04T00:15:37+5:30
नागरिकांचे हाल : टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी
कर्जत : उन्हाळा सुरू होताच कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. तालुक्यातील १७ गावे आणि ५९ आदिवासी वाड्या पाणीटंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्या असून, तेथे पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने ट्रँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी कर्जत तालुका आदिवासी संघटनेने केली आहे.
कर्जत तालुक्यात दरवर्षी मार्च महिना उजाडला की पाणीटंचाई जाणवू लागते. त्यावर मात करण्यासाठी पाणीपुरवठा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विंधण विहिरी खोदणे, विहिरींची दुरुस्ती करणे, विहिरीमधील गाळ काढणे आणि ट्रँकरने पाणीपुरवठा करणे यासाठी निधी राखून ठेवला आहे.
कर्जत तालुक्यातील आनंदवाडी, भगताचीवाडी, काठेवाडी, भल्याचीवाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी, जांभूळवाडी, बांगरवाडी, पेटारवाडी, चाफेवाडी, वडाचीवाडी, टेपाचीवाडी, मोरेवाडी, ताडवाडी, पाली धनगरवाडा, आसलवाडी, नाण्यांचामाळ, भुतीवलीवाडी, आसल धनगरवाडा, सागाचीवाडी, धामणदांड, बोरीचीवाडी-कळंब, काळेवाडी, मिरचुलवाडी, चिंचवाडी, अंथराटवाडी, बेलचीवाडी, आषाणे ठाकूरवाडी, नागेवाडी, भागूचीवाडी-१, भागूचीवाडी-२, सावरगाव ठाकूर वाडी, हऱ्याचीवाडी, विकासवाडी, ठोंबरवाडी, गरुडपाडा, चिमटेवाडी, विठ्ठलवाडी, मेंगाळवाडी, तेलंगवाडी, कोतवालवाडी, कळकराई, बेकरेवाडी, माणगाव ठाकूरवाडी, स्टेशन ठाकूरवाडी, कोतवालवाडी, नवसुचीवाडी, जांभूळवाडी-वारे, खाड्याचापाडा, मधलीवाडी, चाहुचीवाडी, मिरचोलवाडी, नारळेवाडी, भोमळवाडी, दामत कातकरीवाडी आणि नांदगाव विठ्ठलवाडी येथे पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. तेथे ट्रँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी कर्जत तालुका आदिवासी संघटनेने केली आहे.
कृती आराखडा तयार
कर्जत तालुक्यात २०२० मध्ये १४ गावे आणि ५६ आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती. या वर्षी १७ गावे आणि ५९ वाड्यांना पाणीटंचाई भासेल, असे गृहीत धरून पाणीपुरवठा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात मोग्रज, पिंगळस, धामणी, खांडस, पेठ, भुतीवली, खानंद, अंभेरपाडा, ओलमण, आंत्रट वरेडी, मोहोपाडा, चेवणे, ढाक, नांदगाव, तुंगी, अंथराट नीड या गावांचा समावेश आहे.