दत्ता म्हात्रे
पेण : पेणमध्ये वाशी, शिर्की, मसद या खारेपाट विभागातील १२ गावे, ५६ वाड्यांवर सहा टँकरने पाणीपुरवठा होत असताना आता पेण तालुक्यातील पूर्व बाजूला पाणीटंचाईची तीव्रता जाणवत आहे. नव्याने तीन ग्रामपंचायतीचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात आल्याचे गटविकास अधिकारी व्ही.पी. पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आता ती संख्या १५ गावे, ५९ वाड्यांवर जाऊन ठेपली आहे.
उन्हाची तीव्रता वाढत असताना आता पाणीटंचाईची झळ डोंगर भागांतील आदिवासी वाड्यांवर जाणवू लागल्याने पेण तालुक्यातील गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पेण-खारेपाट विभागातील सर्व गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या उन्हाळ्यात दरवर्षी उद्भवते. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पेण पंचायत समितीतर्फे टंचाई निवारणार्थ कृती आराखडा केला जातो. या वर्षीही प्रशासनातर्फे टँकरनेटंचाईग्रस्त गावे व वाड्यांवर पाणीपुरवठा केला जात असून, ४८ गावे, ११४ वाड्यांवर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. १२ गावे ५६ वाड्यांवर सहा टँकरद्वारे पंचायत समितीकडून सुरळीत पाणीपुरवठा केला जात आहे. जसजशी उन्हाची तीव्रता वाढत जाते तसतशी आदिवासीवाड्यांवर टंचाईची झळ बसू लागते.
पेण पंचायत समिती प्रशासनाकडून या टंचाई जाणवू लागलेल्या तीन ग्रामपंचायतीचे नव्याने प्रस्ताव दाखल झाले असून, या ग्रामपंचायत क्षेत्रातील गावे, वाड्यांवर, पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे १२ गावे, ५६ वाड्यांमध्ये वाढ होऊन ती संख्या १५ गावे, ५९ वाड्यावर जाऊन ठेपली आहे. मे महिन्याच्या कालावधीत टंचाईची समस्या आणखीन वाढत जाऊन टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे.
या वर्षी निवडणुकीचा माहोल असल्याने प्रशासनाने टंचाई निवारणार्थ उपाययोजनांमध्ये कमतरता भासू दिली नाही. आता निवडणूक कार्यक्रम संपला असून वाढत जाणाऱ्या टंचाई समस्येची तीव्रता व त्यासाठी करायला लागणाºया उपाययोजनांचे प्रशासनाला काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.