म्हसळा तालुक्यातील ८ गावे, ४ वाड्यांमध्ये पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:55 PM2019-03-26T23:55:17+5:302019-03-26T23:55:40+5:30
शासनाने तातडीने दखल घेऊन टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत मागणीचे निवेदन नपापु योजना समितीने म्हसळा तहसीलदार कार्यालयात दिले आहे.
म्हसळा : यंदा म्हसळा तालुक्यातही पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे, त्यातच शासनाने लघू पाटबंधारे विभागामार्फत ऐन पाणीटंचाईच्या कार्यकाळात पाभरे धरणाच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन धरणातील बहुतांश पाणी विसर्ग केल्याने पाभरे धरणावर अवलंबून असलेल्या नळ पाणीपुरवठा योजना आता पाण्याअभावी ठप्प झाल्या आहेत, याचा मोठा फटका तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजनेला बसला आहे. या योजनेवर अवलंबून असलेली आठ गावे आणि चार वाड्या आता टंचाईग्रस्त झाल्या आहेत. शासनाने तातडीने दखल घेऊन टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत मागणीचे निवेदन नपापु योजना समितीने म्हसळा तहसीलदार कार्यालयात दिले आहे.
पावसाच्या अवकृपेचा म्हसळा तालुक्यालाही चांगलाच तडाखा बसला आहे, त्यामुळे म्हसळा तालुक्यातही पाणीटंचाईचे चटके जाणवत आहेत. म्हसळा तालुक्यातील खरसई त्याचप्रमाणे पाभरे व इतर धरणे पावसामध्ये तुडुंब भरलेली असतानाच ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीस पाणी विसर्ग केल्याने तालुक्यातील संबंधित पाभरे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली गावे टंचाईग्रस्त झाली आहेत. तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजना काम सुरू असल्यामुळे बंद आहे. त्याचा फटका आठ गावे आणि चार वाड्या आता टंचाईग्रस्त झाल्या आहेत. शासनाने तातडीने दखल घेऊन टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत मागणीचे निवेदन नपापु योजना समितीचे अध्यक्ष महादेव पाटील, उपाध्यक्ष मनोज नाक्ती, सचिव सखाराम पवार आदी सदस्यांनी तहसीलदारांना दिले आहेत. या समितीने शासनाला लागलीच पाणीपुरवठा करण्यासाठी दखल घ्यावी, अन्यथा आम्ही ग्रामस्थ लोकशाही मार्गाने आंदोलन करू किंवा होत असलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशाराही दिला आहे.
युती शासनाच्या कार्यकाळात तत्कालीन टंचाईग्रस्त तोंडसुरे
पंचक्र ोशीमधील मूळगाव तोंडसुरे, सकलप-खारगाव खुर्द, रेवळी, बनोटी, गणेशनगर, वरवठणे, आगरवाडा, पेडांंबे ही आठ गावे आणि जंगमवाडी, तोंडसुरे बौद्धवाडी, वरवठणेकोंड, आगरवाडा येथील बौद्धवाडी या चार वाड्यांंकरिता म्हसळा पाभरे धरणामधून विंधण विहिरीमार्फत मोठ्या खर्चाची तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. शासनाची ही योजना काही तांत्रिक अडचणी वगळता गेली २० वर्षे सातत्यपूर्ण कार्यान्वित आहे. या योजना रायगड जिल्हा परिषदेच्या ताब्यात असून, मोठ्या उत्पन्नाची व तेवढीच खर्चिकही आहे. तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजना पूर्णत: धरणाचे उगमस्थान असलेल्या पाण्यावर अवलंबून असल्याने आणि हे धरण नादुरु स्त झाल्याने त्याच्या
दुरु स्तीकरिता धरणातील बहुतांश साठवून ठेवलेले पाणी विसर्ग करण्यात आले आहे. हे दुरु स्तीचे काम शासनाचे लघू पाटबंधारे विभागामार्फत हाती घेतले आहे.
धरणात पाणीसाठा नसल्याने येथील पाणी योजनेच्या सर्व विहिरी आटल्या आहेत, त्यामुळे त्याचा मोठा फटका पाभरे गाव, खारगाव बुद्रुक, सुरई येथील योजनांसह मोठ्या लोकवस्तीच्या तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतील आठ गावे आणि चार वाड्यांना बसला आहे. या गावांना शासनाने तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
पाभरे धरणातील पाण्याचा विसर्ग
आठ गावे, चार वाड्यांची नपापु योजना पाभरे धरणाच्या पाणी स्रोतावर अवलंबून आहे. काही दिवसांपूर्वी या धरणाच्या दुरु स्तीला लघू पाटबंधारे विभागाने धरणावर अवलंबून असलेल्या योजना समितीना काहीही माहिती न देता ऐन टंचाईकाळात धरणातील पाण्याचा विसर्ग केला. त्यामुळे योजनेचे विहिरीतील पाणी आटले आणि आमची योजना पाण्याअभावी बंद पडली आहे. आम्ही रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, लघू पाटबंधारे विभाग, गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेट देऊन सांगितले.
त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही ही बाब गंभीर असून पूर्वी ही गावे टँकरग्रस्त होती ती नपापु योजनेने टँकरमुक्त झाली होती. आता शासनानेच ऐन उन्हाळ्यात पुन्हा आठ गावे आणि चार वाड्या टँकरग्रस्त केल्या आहेत. धरणदुरु स्तीचे हे काम मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात घ्यायला हवे होते किंवा पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे, असे तोंडसुरे नपापु योजना समितीचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी सांगितले.