नियोजनाअभावी पाणीटंचाईचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 12:11 AM2019-04-07T00:11:27+5:302019-04-07T00:11:56+5:30

देखभालीकडे दुर्लक्ष : सुधागड तालुक्यात पाच धरणे, तरी पाणीटंचाई कायम

Water shortage crisis due to lack of planning | नियोजनाअभावी पाणीटंचाईचे संकट

नियोजनाअभावी पाणीटंचाईचे संकट

Next

-विनोद भोईर


पाली : अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील अंबा नदीचे पाणी पहिल्यांदा कमालीचे घटले आहे. त्यामुळे पालीकरांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नियोजनाअभावी पालीकरांवर पाणीटंचाईचे सावट आले आहे.


पालीला अंबा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. दर वर्षी उन्हाळ्यातही नदीला मुबलक पाणी असते, त्यामुळे केवळ मोटार पंप बिघडल्यास, वाहिन्या तुटल्यास, दुरुस्ती असल्यास अनियमित पाणीपुरवठा होतो. मात्र, यंदा पहिल्यांदा अंबा नदीची पाणीपातळी कमालीची घटली आहे. उन्हाळ्यात नदीला येथील जवळच असलेल्या उन्हेरे व कवेळे धरणातून नियमित पाणी मिळते. मात्र, उन्हेरे धरणाची जॅकवेल पूर्णपणे मोडल्याने धरण आटले आहे. तसेच कवेळे धरणालादेखील गळती लागली आहे. याकडे पाटबंधारे विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले. यामुळे नदीचे मुख्य स्रोतच संपुष्टात आले. परिणामी, शासकीय अनास्थेमुळे पालीकरांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या पाणी घटल्याने जॅकवेलमधील मोटार पंप वर दिसत आहेत. पाणी ओढल्यानंतर पुन्हा नदीत पाणी भरण्यास वेळ लागतो.


सुधागड तालुक्यातील धरणाची अवस्था दयनीय
च्तालुक्यात उन्हेरे, कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत आणि कवेळे ही पाच मोठी धरणे आहेत. त्यातील उन्हेरे धरणाची जॅकवेल मागील तीन वर्षांपासून मोडकळीस आली होती. अखेर ती आता पूर्णपणे ढासळली. तसेच डागडुजीअभावी हे धरण मरणासन्न अवस्थेत आहे. कवेळे धरणालाही गळती लागली आहे. तर कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत धरणाच्या कालव्याच्या बंदिस्त नलिकांमध्ये (पाइपलाइन डिस्ट्रिब्युशन नेटवर्क) शेवाळ, मुळ्या, घाण व कचरा जाऊन त्यांच्यात बिघाड झाला आहे. उन्हेरे धरणाची वेळीच दुरु स्ती केली असती तर पालीकरांना टंचाईला सामोरे जावे लागले नसते. या संदर्भात अनेक वेळा बातम्यांच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.


पाण्यासाठी अजून थोडे थांबा
च्कवेळे, ढोकशेत व कोंडगाव धरणाचे पाणी अंबा नदीला सोडण्यासाठी पाली ग्रामपंचायतीतर्फे कोलाड येथील पाठबंधारे विभागाला निवेदन देण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, काही अंतर दूरवर असलेल्या धरणातून पाणी सोडल्यावर ते पहिल्यांदा इतर कालव्यांना जाईल, मग नाले व ओहळ आणि त्यानंतर नदीला मिळेल. यासाठी जवळपास १० -१२ दिवस जातील. परिणामी, तोपर्यंत पालीकरांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
 

ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व उपाय करत आहोत. धरणाचे पाणी येईपर्यंत नदीला काही अंतरावर चर खोदून पुढील पाणी घेण्यात येईल. जेणेकरून पाणीसाठा वाढेल. नागरिकांनीदेखील थोडे दिवस पाणी जपून वापरून सहकार्य करावे.
- गणेश बाळके, सरपंच,
ग्रुप ग्रामपंचायत पाली

Web Title: Water shortage crisis due to lack of planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड