सिकंदर अनवारे
दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील दासगाव गावात ऐन कडक उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे सावट जाणवू लागले आहे. पुढील एक-दोन दिवसांतच कोथुर्डे धरणातील पाणीपुरवठा बंद होण्याची चिन्हे आहेत. गांधारी नदीमधील बंधाऱ्याच्या कामासाठी हे पाणी बंद केले जाणार असल्याने ही टंचाई जाणवणार असल्याचे सरपंच दिलीप उकिर्डे यांनी सांगितले.
दासगावमध्ये दासगाव मोहल्ला, बौद्धवाडी, बामणेकोंड. न्हावीकोंड, भोई आवाड, आदिवासीवाडी अशा जवळपास सात वाड्या आहेत. या वाड्यांवर पिण्याच्या पाण्याचे असलेले स्रोत आता आटू लागले आहेत. गावाला रायगड विभागातील कोथुर्डे गावातील धरणातून पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा मोहोप्रे गावापासून थेट पाइपलाइनद्वारे होत असला तरी कोथुर्डे ते मोहोप्रे या दरम्यान गांधारी नदीत पाणी सोडून केला जातो. मोहोप्रे येथे जॅकवेलमध्ये नदीतील पाणी उचलून त्याद्वारे पुढील गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गांधारी नदी पुनरुजीवन प्रकल्पातून या नदीत ठिकठिकाणी बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. यामुळे हे पाणी बंधाऱ्याच्या ठिकाणी अडवले जाते. शिवाय बंधाºयाच्या कामास सुरुवात करताना पाणी सोडणे बंद केले जाते. यामुळे हे पाणी दोन दिवसांत बंद केले जाणार असल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लघु पाटबंधारे विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.बंधाºयाच्या कामास सुरुवात होताच पाणी बंद करण्यात येणार आहे. यामुळे दासगावसह गांधारपाले, केंबुर्ली, वहूर या गावांचा पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. उन्हाचे चटके जाणवू लागल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दासगाव गावाशेजारी खाडीचे पाणी वाहत आहे. मात्र, हे पाणी दूषित असल्याने वापरात येत नाही. कोथुर्डे धरणातील पाणीच पिण्यासाठी वापरले जाते. गांधारीमध्ये पाणी सोडल्यानंतरच या गावांची तहान भागते. वारंवार तांत्रिक बिघाड आणि गांधारी बंधारे कामामुळे पाणीपुरवठा ठप्प होत आहे, यामुळे दासगावमध्ये पाणीटंचाई निर्माण होते.च्दासगाव गावाच्या वरील बाजूस असलेल्या कोंडीत पाण्याचा साठा आहे. मात्र, याठिकाणी बांधलेल्या बंधाºयातील पाणी खाली आणण्यास अद्याप कोणतीच योजना राबवली नाही. शिवाय औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीने लाखो रु पये खर्ची घालून पाणी योजना राबवली. मात्र, त्यामधून देखील पाणीपुरवठा होत नाही. यामुळे हे पैसे वाया गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.गावाला होणारा पाणी पुरवठा हा कोथुर्डे धरणातून होतो. मात्र, गांधारी नदीत होत असलेल्या बंधाऱ्यांच्या कामासाठी हे पाणी सोडणे बंद केले जाते. यातून ठेकेदाराचा फायदा होतो. मात्र, ग्रामस्थांचे हाल होत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केला आहे.- दिलीप उकिर्डे, सरपंच, दासगाव