नवीन योजना नसल्याने कर्जतमध्ये पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 12:07 AM2021-03-11T00:07:21+5:302021-03-11T00:08:20+5:30

नियोजनाअभावी उद्भवली परिस्थिती; पंचायत समिती काम करीत नसल्याचा आरोप

Water shortage in Karjat due to lack of new scheme | नवीन योजना नसल्याने कर्जतमध्ये पाणीबाणी

नवीन योजना नसल्याने कर्जतमध्ये पाणीबाणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाई जाणवून टँकर सुरू केले जातात. टँकरमाफियांची निर्माण झालेली साखळी व त्यांना पोसण्यासाठी कर्जत पंचायत समिती काम करीत असल्याचा आरोप खुद्द विद्यमान सदस्यांनीच केला आहे. मागील वर्षात कोणत्याही नळपाणीयोजनांवर पंचायत समितीने पंधरावा वित्त आयोग किंवा सेसचा निधी खर्च केला नाही. त्यामुळे नळपाणीयोजना आहेत, त्या स्थितीत असून पाणीपुरवठ्यासंबंधी नवीन योजना राबविल्या गेल्या नसल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष फेब्रुवारी महिन्यातच जाणवू लागल्याने तालुक्यात पाणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्रत्येक पंचायत समिती सदस्याला सेसचा निधी द्यावा, असे रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश आहेत. मात्र, कर्जत पंचायत समितीमध्ये हा निधी वर्ग करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी पंधराव्या वित्त आयोगातील निधीचे वाटप सर्व पंचायत समिती सदस्यांना नियोजन करून केले नाही. त्यामुळे आदिवासी भागात पाणीपुरवठ्यासंबंधीची कामे मागील वर्षभरात वेळेवर करता आली नाहीत, असा आरोप पंचायत समिती सदस्य जयवंती हिंदोळा यांनी केला आहे. पंधराव्या वित्त आयोगाचा निधी प्रामुख्याने पाणीपुरवठ्यावर खर्च करावा, अशी सूचना असताना मागील वर्षात कर्जत पंचायत समितीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आदिवासीवाड्या आपल्या नादुरुस्त नळपाणीयोजनेच्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत, तर सातत्याने पाणीटंचाई अनुभवणाऱ्या आदिवासीवाड्या नळपाणीयोजनेच्या व पाणीपर्याय वाढवून देण्यासाठी आवश्यक निधीच्या मागे लागल्या होत्या. मात्र, मागील वर्षात कर्जत पंचायत समितीच्या माध्यमातून नळपाणीयोजनांची दुरुस्ती झाली नाही किंवा कामेही झाली नाही. पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती व्हावी, असे सदस्य ओरडून सांगत असूनही पंचायत समितीचे प्रशासन काहीच हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे विरोधी सदस्यांना कोणतीही किंमत कर्जत पंचायत समितीमध्ये राहिली नाही, असा आरोपही विरोधी पक्षाचे सदस्य करीत आहेत.

nपंचायत समितीच्या सर्व सदस्यांना सेस निधीचे समांतर वाटप करणे, ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना कळविली आहे. असे असताना आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी भागातील पंचायत समिती सदस्य हिंदोळा यांनी केली आहे.
nदुसरीकडे सर्वत्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. मग, मागील वर्षात पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी एकही रुपया खर्च न करणाऱ्या कर्जत पंचायत समितीमधील पदाधिकारी-अधिकारी हे आदिवासी आणि दुर्गम भागातील पाणीटंचाई दूर कशी करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरवर्षी आम्हाला टँकरने व तेही चार दिवसांतून एकदाच पाठवले जाणार आहे काय? आमच्यासाठी चांगली पाणीयोजना शासन राबविणार आहे की नाही, असे अनेक प्रश्न कर्जत तालुका आदिवासी संघटनेचे अध्यक्ष भरत शिद यांनी उपस्थित केले आहेत.

'कर्जत पंचायत समितीने मागील वर्षी २०२० मध्ये २५ आदिवासीवाड्या आणि सात गावांना टँकरने पाणीपुरवठा केला आहे. या वर्षीदेखील पाणीटंचाईग्रस्त वाड्या आणि गावांना टँकरने पाणी देण्याचे नियोजन केले आहे.
-बाळाजी पुरी, 
गटविकास अधिकारी, 
कर्जत पंचायत समिती

 

Web Title: Water shortage in Karjat due to lack of new scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.