कर्जत तालुक्यात पाणीटंचाई
By admin | Published: April 19, 2016 02:26 AM2016-04-19T02:26:18+5:302016-04-19T02:26:18+5:30
तालुक्यात मागील वर्षीपेक्षा अधिक पाणीटंचाई जाणवत आहे. कारण शासनाच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात गावे आणि वाड्यांची संख्या जास्त आहे
संजय गायकवाड, कर्जत
तालुक्यात मागील वर्षीपेक्षा अधिक पाणीटंचाई जाणवत आहे. कारण शासनाच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात गावे आणि वाड्यांची संख्या जास्त आहे. यावर्षी १४ गावे आणि ३४ आदिवासी वाड्यांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकर तसेच बैलगाडीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त तीन गावे-वाड्यांनी टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे.
कर्जत तालुक्याचा बहुतांश भाग आदिवासी आणि दुर्गम आहे. त्यात तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांपैकी एक वगळता अन्य नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात. पेज नदी पुढे उल्हास नदीला जाऊन मिळते. त्यामुळे हा परिसर सोडला तर अन्य भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य दिसून येते. त्यातही पाणीटंचाई जाणवत असलेल्या भागात पाझर तलाव बांधण्यात आल्याने काही प्रमाणात रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र तालुक्यातील मोठी लोकवस्ती ही दुर्गम भागात वसली असल्याने तेथे पिण्याच्या पाण्याची समस्या प्रचंड प्रमाणात भेडसावत असते. अशावेळी त्या भागातील निर्माण होणारी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी शासनाकडून पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आमदार सुरेश लाड, तहसीलदार रवींद्र बाविस्कर, कर्जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अशोक थुळे, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यावर सह्या आहेत. तालुक्यात एप्रिल २०१६ पासून १४ गावे आणि ३४ आदिवासी वाड्यांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकर किंवा बैलगाड्या सुरू करण्यात येतील, असे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. मागील वर्षी १० गावे आणि ३१ आदिवासी वाड्यांना टँकर पाणीपुरवठा करण्यात आला होता.
टंचाईग्रस्त आदिवासी वाड्यांमध्ये यावेळी ३४ वाड्या सरकारी आराखड्यानुसार जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या वाड्यांपर्यंत टँकरने पाणी पोचवावे, असा प्रयत्न पाणीटंचाई कृती समिती करणार आहे. १४ आदिवासी वाड्यांपैकी खांडस, मोग्रज, मिरचूल वाडीला टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव पंचायत समितीमध्ये पोहोचले आहेत. तेथून कर्जत तहसील कार्यालय आणि आता त्या तीन ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबतचे प्रस्ताव रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविले आहेत.
> कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई सर्वत्र जाणवत आहे. तालुक्यातील दोन गावे आणि एका वाडीमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा, यासाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. ते आमच्या कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले असून, जिल्हा प्रशासनाने एक टँकर मंजूर केला आहे. तो तालुक्यात येताच टंचाईग्रस्त गावांना टँकर सुरू केले जातील.
- रवींद्र बाविस्कर,
तहसीलदार, कर्जत