महाडमध्ये पाणीटंचाईच्या झळा
By admin | Published: March 18, 2016 12:15 AM2016-03-18T00:15:28+5:302016-03-18T00:15:28+5:30
दरवर्षी पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्चूनही महाड, पोलादपूर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी येत्या काही दिवसात
- संदीप जाधव, महाड
दरवर्षी पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्चूनही महाड, पोलादपूर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी येत्या काही दिवसात ही पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाने टंचाई आराखडा तयार केला असून त्यानुसार महाड तालुक्यात ४९ गावे २०१ वाड्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही तालुक्यातील काही दुर्गम ठिकाणच्या वाड्यांवर तर दोन दोन किमी अंतरावरुन पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागत असून शहरानजिकच्या केंबुर्ली गावात तर पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे.
महाड तालुक्यात नळपाणी योजनांची २१ कामे मागील वर्षी मंजूर असून त्यापैकी निम्मी कामे पूर्ण झाली आहेत तर उर्वरित कामे प्रगतिपथावर असली तरी ठेकेदार व स्थानिक ग्रामस्थांच्या वादात ही कामे रखडल्याची माहिती पुढे आली आहे. चोचिंदे गौळवाडी १५ लाख, कोंडीवते ५० लाख, कांबळे तर्फे बिरवाडी ५० लाख, आढी डोंडरवाडी १७ लाख, शिरवली ५० लाख, जीते ५० लाख, हिरकणीवाडी तलाव ३२ लाख आदी कामे सुरु असून यापैकी काही कामे स्थानिक अडचणीमुळे प्रलंबित आहेत. पोलादपूर तालुक्यात राष्ट्रीय पेयजल योजनेतून ११ कामे मंजूर असून त्यापैकी ८ कामे पूर्ण तर ३ कामे प्रगतिपथावर आहेत.
धरण झाल्यास टंचाईवर मात : महाड तालुक्यात काळ नागेश्वरी तसेच कोथेरी धरणांची कामे गेल्या तीन चार वर्षांपासून रखडलेली आहेत तर पोलादपूर तालुक्यातील धारवली, कातवली धरणांचा प्रकल्प देखील अर्धवट स्थितीत आहे. हे धरण प्रकल्प पूर्ण झाल्यास दोन्ही तालुक्याची पाणीटंचाईची समस्या पूर्णपणे निकाली निघेल असे अनेकांचे मत आहे. महाड, पोलादपूर तालुक्यात दरवर्षी पाणीपुरवठा योजनांवर अक्षरश: कोट्यवधी रुपयांचा निधी शासन खर्च करते मात्र या दोन्ही तालुक्याला वर्षानुवर्षे लागलेले टंचाईचे ग्रहण सुटत नसल्याने स्थानिक प्रशासन देखील हतबल होत आहे.
टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे नियोजन
यंदाही टँकरग्रस्त गावे व वाड्यांची स्थिती कायम असून १५ एप्रिलपासून या दोन्ही तालुक्यात प्रस्तावित ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट के ले आहे. महाडमध्ये ताम्हाणी धनगरवाडी, कावळे धनगरवाडी,
रावतळी मातेचा धार, गिझेवाडी, पांगारी धार, पाचाड, वीर मनवेकोंड, खडकवाडी, माझेरी, पारमाची, वाळसरे, पिंपळकोंड, निजामपूर, गोंडाळे, शेडगेकोंड, झांजेकोंड, किंजकोळी, नातोंडी, वाकी, कोळोसे आदी गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
पोलादपूर तालुक्यात बोरघर, आडावळे, पोफळ्याचा तुरा, बोरावळे चाळीचा कोंड, खांडज, किनेश्वर वाडी, गोवेले, साळवेकोंड, महादेवाचा मुरा आदींसह ९ गावे आणि ४४ वाड्यांवर दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो.
यंदाच्या वर्षी गतसालच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने अनेक पालिका योजनांच्या स्रोतांनी आज अक्षरश: तळ गाठलेला आहे. त्यामुळे यंदा ही पाणीटंचाईची झळ अधिक तीव्र जाणवेल अशी शक्यता आहे. टंचाईवर मात करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
- शैलेश बुटाला, शाखा अभियंता,
पाणीपुरवठा विभाग, महाड