माणगावमध्ये पाणीटंचाई
By admin | Published: March 19, 2016 12:48 AM2016-03-19T00:48:13+5:302016-03-19T00:48:13+5:30
तालुक्यातील २९ गावे व ४३ वाड्यांना या वर्षी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल असा शासकीय यंत्रणेचा अंदाज आहे. ४९ विंधन विहिरी व टँकरला मंजुरी मिळाली आहे.
- नितीन देशमुख, माणगाव
तालुक्यातील २९ गावे व ४३ वाड्यांना या वर्षी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल असा शासकीय यंत्रणेचा अंदाज आहे. ४९ विंधन विहिरी व टँकरला मंजुरी मिळाली आहे. दोन वर्षात ३०० कोटींपेक्षा जास्त खर्च करूनही अनेक वाड्या शासनाच्या निकषामुळे कायम तहानलेल्याच राहणार आहेत.
माणगाव तालुक्यातून काळ व गोद या नद्या वाहतात. रावळजे, भिरा, पन्हळघर, कुंभे, नांदवी ही धरणे व साई येथे पाझर तलाव आहे. या तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ६७०३९ हे.आर.आहे. १८७ महसुली गावे असलेल्या या तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी नदी, विहिरी व कालवा यावर अवलंबून राहावे लागते. काळ प्रकल्पामुळे सुरु वातीला ४४८० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत होते मात्र आता केवळ २५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. कालव्याच्या ओलिताखाली असलेल्या भागातील विहिरींना मे महिन्यापर्यंत पाणी राहते तसेच काळ नदीत पाणी असते. कालवा बंद झाल्यावर माणगावच्या पाणीपुरवठा योजनेवरही परिणाम होतो. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कालवा अनेक ठिकाणी लिकेज आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी फुकट जाते. तालुक्यातील मशिदवडी, शिलीम, करंबेली व हरवंडी ही गावे व वडाचीवाडी, डोंगरोळ बुद्धवाडी, कावीळवल धनगरवाडी व खैरची वाडी यासारख्या १२ वाड्या शासनाच्या निकषामुळे कायम टंचाईग्रस्तच राहतात. माणसी ३०२८ रु पये शासन पाणीपुरवठा योजनेसाठी देते. लोकसंख्येच्या तिप्पट रक्कम मिळते. या वाड्यांची लोकसंख्या ५०० सुध्दा नाही.
पाण्याचा स्रोत जवळ नाही त्यामुळे योजना देता येत नाही. यासाठी निकष बदलणे गरजेचे आहे. अनेक गावात योजना पूर्ण झाल्या आहेत मात्र अगोदरची थकबाकी असल्याने वीज पुरवठा होत नाही. यामुळे योजना बंद राहते. यासाठी अक्षय जीवन योजना सुरू करून ५० टक्के वीज बिल भरा ५० टक्के थकीत बिल माफ केल्यास प्रश्न सुटू शकतो.
जीवन प्राधिकरणाने दोन वर्षात २० ग्रामीण योजनांवर ९३९.६७ लाख
रुपये तर ७ प्रादेशिक योजनांवर १८५०.३३ लाख रु पये खर्च करून पूर्ण केल्या. राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मांतर्गत ५ कोटीच्या योजना पूर्ण केल्या आहेत. या योजना ग्रामीण पाणीपुरवठा समितीमार्फत केल्या जातात. या समितीचे कामावर नियंत्रण असते.
सभापती अलका केकाणे म्हणाल्या की, गावकऱ्यांची मागणी येताच तातडीने कारवाई करतो. धनगरवाडीच्या प्रस्तावावर पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. माणगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे यांनी माणगावात रोज ३६ लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो असे सांगून जुने माणगाव भागात फिल्टर पाणीपुरवठा करण्यासाठी आमदार सुनील तटकरे यांच्यामार्फत प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यात येत आहे. लवकरच ती मिळेल असे सांगितले.
टँकरला मंजुरी : १० गावे व ३९ वाड्यांना विंधन विहिरी मंजूर झाल्या आहेत. २९ गावे व ४३ वाड्यांसाठी टँकरला मंजुरी मिळाली आहे. पं.स. गटविकास अधिकारी पुरी यांनी देगाव आदिवासीवाडीचा प्रस्ताव आला असल्याचे सांगितले.
नियम चुकीचा
उपसभापती गजानन अधिकारी यांनी शासनाने बोअरिंग करताना २०० मीटरऐवजी ३०० मीटरची परवानगी देणे गरजेचे असल्याचे संगितले. ग्रामीण भागात माणसी ४० लिटर पाणी हा नियम चुकीचा आहे .