- अरुण जंगमम्हसळा : यंदा तापमान प्रचंड वाढल्याने सर्वच ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. तालुक्यात दोन वेळा नळपाणी योजनांचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात थेंबभर पाणीही नागरिकांना मिळाले नाही. ग्रामीण भागासह शहरातही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, टँकरने पाणीपुरवठ्याबाबत सरकार दरबारी अद्याप हालचालींना वेग आलेला नाही.जिल्ह्यातील चांगल्या पर्जन्यमानाच्या तालुक्यांमध्ये म्हसळा तालुक्याचा नेहमीच समावेश होतो. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे जलसिंचन, पाणीक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न झालेले दिसत नाहीत. तालुक्यातील जलसाठ्यात कमालीची घसरण झाल्याने पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणलोट योजना, वनराई उपक्रम, शासनाचे विविध प्रकारचे उपक्रम कागदावरच यशस्वी झाले आहेत. प्रत्यक्षात जनतेला त्याचा काहीच उपयोग झालेला नाही.म्हसळा शहरास भापट येथील धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने शहरास तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. तर शहरातील काही भागांत टँकरनेच पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.शहराला पाणीटंचाईने ग्रासले असून, सतत चार वर्षे टंचाईची झळ बसत आहे. गेली दहा वर्षे पाभरा धरणातील पाण्याची वाट परिसरातील नागरिक पाहत आहेत. याबाबत नगरपंचायत प्रशासानासहित राज्य शासनापर्यंत जाब विचारण्यासाठी शहरातील नागरिकांची सभा घेऊन म्हसळा पाणी संघर्ष समितीची स्थापना केली आहे.शहरातील मुख्य पाण्याच्या स्रोतातील पाणी संपल्यामुळे नगरपंचायतीने अनेक ठिकाणी बोअरवेल करून हे पाणी मुख्य टाकीमध्ये साठवून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला; परंतु हे पाणी शुद्धीकरण केलेले नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. काही भागात टँकरने पाणीपुरवठा होत असून पाण्यासाठी झुंबड उडत आहे.म्हसळा शहरात दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात असताना तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी एक कोटी ८४ लाख रकमेची योजना मंजूर करून आणली होती; परंतु तत्कालीन कंत्राटदार, सरपंच, सदस्य, पाणी समिती अध्यक्ष यांच्या भोंगळ व भ्रष्टाचारी कामामुळे ही योजना रखडली. त्या योजनेचे दोन वेळा भूमिपूजन झाले; परंतु या योजनेचे दोन थेंब पाणीही म्हसळा शहरवासीयांना अद्यापपर्यंत मिळाले नाही.
म्हसळा तालुक्यात तीव्र टंचाई : दोन वेळा भूमिपूजन तरीही पाणी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 1:36 AM