रायगडमध्ये पाणीटंचाई; नागरिकांची वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 01:05 AM2019-04-27T01:05:32+5:302019-04-27T01:05:41+5:30
नऊ तालुक्यातील ३० गावे, १३० वाड्यांना झळ
अलिबाग : रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईची भीषणता वाढल्याने नऊ तालुक्यातील ३० गावे आणि १३० वाड्यांना टंचाईची झळ बसत आहे. तब्बल ३५ हजार ६०३ नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाने २० टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामध्ये एका सरकारी आणि १९ खासगी टँकरचा समावेश आहे. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका हा पेण तालुक्याला बसला आहे. येथील ११ गावे आणि ५३ वाड्यातील २१ हजार ४८० नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
पाणीबाणीची परिस्थिती खऱ्या अर्थाने वाड्या वस्त्यांवर अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. शहरांमध्ये आणि शहरालगत असणाºया गावांना त्याचा विशेष तडाखा बसत नसला तरी वाडी वस्तीवर राहणाºया कुटुंबांची तहान भागवण्यासाठी महिला आणि तरुण मुलींना पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन पायपीट करावी लागत आहे. उन्हाचा प्रचंड तडाखा वाढलेला आहे. अशा कडक उन्हात त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणे हे तेथील सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींचे अपयश असल्याचे अधोरेखित करते. वाड्या वस्त्यांवर अद्यापही पाण्याची पाइपलाइन पोचलेली नाही. त्यामुळे डोंगर कपारी असणाºया डोहातील पाणी त्यांना उदरनिर्वाहासाठी भरावे लागत आहे. हे पाणी अशुद्ध असले तरी कोरडे पडलेले घसे ओले करण्यासाठी त्यांना तेथील पाणी पिण्यावाचून पर्याय राहिलेला नसल्याचे दिसून येते.
रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पाऊस पडतो, मात्र पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते. जिल्ह्यात मोठी धरणे निर्माण करण्यात सरकार आणि प्रशासनाला अपयश आलेले आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वात असलेल्या धरणांची योग्य ती डागडुजी करण्यात न आल्यानेही पाण्याची समस्या निर्माण होत आहे. उन्हाचा तडाखाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. परिणामी जलसाठ्यातील पाणी आटत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्येक गावातील आणि वाड्यातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे हा मूलभूत अधिकार आहे.
पाणीपुरवठ्याच्या योजना सुरू करूनही शेवटच्या घटकापर्यंत पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वाड्या वस्त्यांवरील महिलांचीही पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. काही भागांमध्ये रात्र-रात्र पाण्यासाठी जागावे लागत आहे, तर काही ठिकाणी नागरिकांना विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टंचाईच्या आराखड्यावर नजर टाकल्यास शहरी भागांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे सध्यातरी दिसत नाही.
उरण तालुक्यातील दोन वाड्यांवरील ३९७ नागरिकांना पाण्याची समस्या भासत आहे. यासाठी प्रशासनाने एका टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.
पनवेल तालुक्यातील दोन वाड्यांवरील एक हजार ४८० लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी एका टँकरची व्यवस्था केली आहे.
कर्जत तालुक्यातील तीन गावे आणि १६ वाड्यांतील एक हजार २३५ नागरिकांसाठी तीन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पेण तालुक्यातील ११ गावे आणि ५३ वाड्यांवरील २१ हजार ४८० नागरिकांची पाण्याची पायपीट थांबावी यासाठी सहा टँकरची व्यवस्था केली आहे.
महाड तालुक्यातील ७ गावे आणि १७ वाड्यांमधील सहा हजार २१८ लोकसंख्येसाठी दोन टँकरने पाणी पुरवण्यात येत आहे.
मुरुड तालुक्यातील एका गावातील एक हजार २८१ नागरिकांसाठी एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
तळा तालुक्यातील एका वाडीवरील २९८ नागरिकांची तहान भागवण्यासाठी एका टँकरची सुविधा पुरवण्यात आली आहे.
रोहे तालुक्यामध्ये एका वाडीवरील ६४ लोकसंख्येसाठी एका टँकरने तहान भागवण्यात येत आहे.
पोलादपूर तालुक्यामधील आठ गावे आणि ३४ वाड्यांतील चार हजार १५० नागरिकांसाठी चार टँकरची व्यवस्था केली आहे.