रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाई होणार दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 02:37 AM2018-07-05T02:37:44+5:302018-07-05T02:37:52+5:30
रायगड जिल्ह्यामध्ये जलस्वराज्य टप्पा-२ अंतर्गत पाऊस पाणी संकलन योजना कार्यान्वित करण्यात आली होती. कर्जत, पोलादपूर आणि महाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये २२ पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत.
- आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये जलस्वराज्य टप्पा-२ अंतर्गत पाऊस पाणी संकलन योजना कार्यान्वित करण्यात आली होती. कर्जत, पोलादपूर आणि महाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये २२ पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. तब्बल ७६ लाख लिटर पावसाचे पाणी त्यामध्ये साठवले जाणार असल्याने तेथील पाणीटंचाईवर प्रशासनाला सहज मात करता येणार आहे. तीन तालुक्यांत योजना यशस्वी झाल्यामुळे आता १२ तालुक्यांत १८१ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. या प्रस्तावांना सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे नजीकच्या कालावधीत करोडो लिटर पावसाचे पाणी साठवण्याच्या दिशेने जिल्ह्याचे सकारात्मक पाऊल पडले आहे.
जिल्ह्यामध्ये सरासरी साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजणारी धरणे आहेत, तर लघुपाट बंधारेअंतर्गत २८ लहान धरणे आहेत. पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने पहिल्या पावसात आठवडाभरातच सदरची धरणे भरण्यास सुरुवात होते. जुलै महिन्यामध्ये तर ही धरणे दुथडी भरून वाहू लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याचे नियोजन न केल्याने सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते. पावसाच्या पाण्याचा म्हणावा तसा उपयोग केला जात नसल्याने जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईला सुरुवात होते.
पिण्याचे पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामध्ये महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी तर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. यावर मात करण्यासाठी सरकारने जलस्वराज्य टप्पा-२ आखला. त्यामध्ये पाऊस पाणी संकलन योजना कार्यान्वित करण्यात आली. २०१४-२०२० या कालावधीसाठी ही योजना आखण्यात आली आहे. यासाठी जागतिक बँकेचे अर्थसाहाय्य उपलब्ध करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यासाठी २७ पाण्याच्या टाक्या मंजूर करण्यात आल्या होत्या. पोलादपूर तालुक्यात १४ पैकी १३ टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. महाड तालुक्यात आठ टाक्या प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. तेथे सहा टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. कर्जत तालुक्यामध्ये चार टाक्यांपैकी तीन टाक्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. रोहे तालुक्यातील उसर ठाकूरवाडी येथील एक टाकी मंजूर करण्यात आली होती. मात्र, नंतर ती रद्द करण्यात आली. २७ पैकी २२ टाक्या बांधून पूर्ण झाल्या आहेत. सध्या पावसाचा जोर कायम असल्याने त्या टाक्या भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. २२ टाक्यांची एकूण क्षमता ही तब्बल ७६ लाख लिटर आहे. यंदाच्या पावसामध्ये त्या टाक्यांमध्ये पावसाचे पाणी साठवले जात आहे. त्या पाण्याचा उपयोग टंचाईच्या कालावधीत नागरिकांना होणार असल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागायची ती आता थांबणार आहे.
पोलादपूर, महाड, कर्जतमध्ये यश
पोलादपूर, महाड आणि कर्जत तालुक्यामध्ये ही योजना यशस्वी ठरल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेने सरकारकडे आणखीन १८१ ठिकाणी योजना राबवण्याची तयारी दाखवली, मात्र कालावधी कमी असल्याने त्याला मान्यता मिळत नव्हती.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी सातत्याने पाठपुरवा करून रायगड जिल्ह्याच्या पदरात १८१ टाक्यांचे दान पाडून घेतले आहे. त्यामुळे आता नव्याने १२ तालुक्यांमध्ये १८१ टाक्या बांधण्यातील प्रमुख अडथळा आता दूर झाला आहे, असे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून देखील जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. यासाठी पाऊस पाणी संकलन योजना महत्त्वपूर्ण आहे. १८१ टाक्यांमुळे जिल्ह्यातील गावे टँकरमुक्त होण्यास मदत मिळणार आहे.
- अभय यावलकर,
मुख्यकार्यकारी अधिकारी