- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून टँकरने पाणीपुरवठा करता यावा, यासाठी सरकारने सलग तीन वेळा निविदा काढल्या होत्या. मात्र, एकदाही निविदेला कोणत्याच पुरवठादाराने प्रतिसाद दिलेला नाही, तर दुसरीकडे ग्रामीण भागांमध्ये पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. एकट्या पेण तालुक्यातील ११ गावे आणि ६२ वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा अशा मागणीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. टँकरने पाणीपुरवठा करणारा ठेकेदारच अद्याप ठरलेला नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवणार कशी असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर उभा राहिला आहे. प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा फटका जिल्ह्यातील नागरिकांना बसत आहे. त्यामुळे तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे.जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनदेखील त्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन न केल्यामुळे समुद्राला जाऊन मिळते. गेली कित्येक वर्षे अशीच स्थिती जिल्ह्यात आहे. वाढत्या तापमानामुळे तसेच पाण्याच्या अतिवापरामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. यावर उपाययोजना म्हणून सरकार आणि प्रशासनाने वनराई बंधारे, जलयुक्त शिवार असे विविध कार्यक्रम हाती घेतले. त्याचप्रमाणे नद्या, तलाव, धरणांमधील गाळ काढणे असे उपायही केले. काही पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करणे, नव्याने पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे याद्वारे पाण्याची भासणारी चणचण दूर करण्याचा प्रयत्न केला. नेहमीच आॅक्टोबर महिन्यापासून सुरू होणारी पाणीटंचाई या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जाणवली नाही ही जमेची बाजू असली तरी, मार्च महिन्यापासून जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसणार हे गृहीत धरून पाणीटंचाई कृती आराखडा हा तब्बल नऊ कोटी रुपयांवर नेण्यात आला आहे. त्यामध्ये पाणीपुरवठ्याच्या बाबतीतील विविध कामे करण्यात येणार आहेत.पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील ३३१ गावे आणि ९२६ वाड्या अशा एकूण एक हजार २५७ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल चार कोटी ५२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. सलग तीन वेळा निविदा जाहीर करूनही त्याला कोणत्याच ठेकेदाराने अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही.जिल्ह्यात तापमानात वाढ होत असल्याने उन्हाच्या झळा जाणवत आहेत. त्याचा परिणाम हा ग्रामीण भागातील पाण्यावर होत आहे. ग्रामीण भागामध्ये पाण्याची चणचण भासत असल्याने महिलांची भटकंती सुरू झाली आहे.
पोलादपूर तालुक्यात पाणीसमस्या गंभीरपोलादपूर : तालुक्यातील बहुतेक गावे उंच डोंगरावर आहेत. त्यामुळे पाणी साठवण्याची कोणतीच उपाययोजना नसते. त्यामुळे पावसाचे पाणी तीव्र उतारामुळे वाहून जाते व समुद्राला जाऊन मिळते. परिणामी, मार्च-एप्रिल महिन्यांतच प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागात पाणीसमस्या गंभीर होत असून शिमग्याच्या सणाला गावी आलेल्या चाकरमान्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला, तर काही ग्रामपंचायतींना टँकरचा आधार घ्यावा लागला.भविष्यात पोलादपूर तालुक्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी पाणी नियोजनाची गरज आहे. पाणीसाठे पुनरुज्जीवित करण्याची नितांत गरज आहे. नद्यांवर छोटे-छोटे कोल्हापूर टाइप बंधारे घालून पाणी अडविण्याची आवश्यकता आहे. पोलादपूर तालुक्यात फक्त रानबाजिरे येथे एमआयडीसीने बांधलेले धरण आहे, त्यामुळे पोलादपूर शहराला मोठा दिलासा मिळतो.पोलादपूर तालुक्यात पाणी सिंचनाची कोणतीच उपाययोजना केली नाही. तालुक्यात चार धरणे मंजूर असताना फक्त किनेश्वर व लोहारे खोंडा येथील धरणाचे काम चालू केले नंतर मात्र बंद करण्यात आले, तर कोतवाल व इतर धरणांचे तर कामच चालू केले नाही. देवळे व सवाद विभागातील धरणे शासकीय अनास्थेने रखडली आहेत. त्यामुळे ही रखडलेली कामे लवकर पूर्ण व्हावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.तातडीने पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणीपेण, महाड, पोलादपूर, रोहे, अलिबाग, कर्जत यासह अन्य तालुक्यांमध्ये टँकरची गरज भासते. त्यानुसार पेण तालुक्यातील ११ गावे आणि ६२ वाड्यांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.कर्जत तालुक्यातीलही काही प्रस्ताव आले होते. मात्र, २० मार्च रोजीच्या परिपत्रकानुसार प्रत्येक तालुक्यातील पाण्याची स्थिती, गरज लक्षात घेऊन प्रस्ताव तयार करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून नव्याने प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.याचाच अर्थ त्याठिकाणीही पाण्याची टंचाई जाणवत आहे. असे असताना अद्यापही टँकर पुरवठादार निश्चित न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात येत आहे.सरकारच्या सूचनेनुसार निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. तीनही वेळेला एकाही ठेकेदाराने प्रतिसाद दिलेला नाही. जिल्ह्यातील पाण्याच्या टँकरची मागणी विचारात घेता लगतच्या जिल्ह्यातील टँकर पुरवठारांचे असणारे दर काय आहेत, याची माहिती घेऊन रायगड जिल्ह्यातील तालुक्यांसाठी एक दर निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित स्थानिक पातळीवर पुरवठादाराकडून पाण्याची गरज भागवण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.- रवींद्र मठपती, उपजिल्हाधिकारी