नेरळ : कर्जत तालुक्यातील आदिवासी ग्रामस्थ आणि महिलांना दिवाळी त्रासदायक ठरली आहे. ऐन दिवाळीतच कर्जत तालुक्यातील धाबेवाडी आणि बांगारवाडी आदिवासीवाड्यांमध्ये महिलांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दोन गावांच्या मध्ये काही वर्षांपूर्वी विहीर शासनाच्या योजनेतून बांधण्यात आली. या विहिरीवर जाण्यासाठीचा मार्ग फार्महाउसच्या मालकांनी काही आश्वासनाच्या जोरावर ग्रामस्थांकडून अडवून ठेवला आहे. त्यामुळे अधिकच लांबून पाणी आणावे लागते. ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांना पाणी सहज आणणे शक्य होते.
विहिरींत डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत जेमतेम पाणी शिल्लक असते; पण त्यानंतर विहिरी पूर्ण आटून जातात. यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आठवड्यातून दोन वेळा वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तालुक्यातील लोकप्रतिनिधी या आदिवासी बांधवांकडे लक्ष देत नसल्याने, आदिवासी सुविधांपासून वंचित आहेत. लोकप्रतिनिधी आणि अधिकारीवर्गाने याकडे लक्ष दिले तर पाण्याची समस्यासुटू शकते.पावसाळा संपल्यावर दोन महिन्यांतच विहिरीचे पाणी आटते. त्यानंतर आमच्या आदिवासी महिलांना डवऱ्याने पाणी पाणी भरावे लागते, दिवाळी असूनही आम्हाला डवºयानेच पाणी भरावे लागत आहे. आमच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने आम्हाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.- मंजुळा गावंडा, महिला, बांगारवाडीधाबेवाडी येथून विहिरीवर जाण्यासाठी पूर्वीपासूनचा एक रस्ता आहे, बांगारवाडी आणि धाबेवाडी येथील ग्रामस्थ या रस्त्यावरून विहिरीवर जात होते. येथील जागा मुबंईच्या धनिकाने खरेदी केल्याने त्या मालकाने कंपाउंड टाकून रस्ता अडवला आणि वाडीमध्ये पाइप टाकून पाणी दिले जाईल, असे सांगितले; परंतु अद्याप पाइप टाकून दिले नाहीत.- तातू हिंदोळा, ग्रामस्थ, धाबेवाडी