ग्रामस्थांना मदरशातून पाणीपुरवठा; ममदापूरमध्ये खानकाहे संस्थेचे सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:07 PM2019-06-07T23:07:15+5:302019-06-07T23:07:27+5:30
उल्हासनदीवर जाण्यासाठीची पायपीट थांबली
विजय मांडे
कर्जत : नेरळ विकास प्राधिकरणचा भाग असलेल्या आणि नेरळ शहराला लागून असलेल्या ममदापूर गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. तेथील अर्ध्या भागाला मुस्लीम विद्यार्थ्यांच्या मदरशामधून पाणी पुरविले जाते. खानकाहे या मदरशामधून पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांची तहान भागत आहे. त्यामुळे उल्हासनदीवर पाण्यासाठी जाण्याची पायपीट थांबली आहे.
ममदापूर हे हिंदू-मुस्लीम लोकवस्ती असलेले गाव असून, या गावाला नेरळ ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जातो. पूर्वी ममदापूर गाव हे एकत्रित नेरळ ग्रामपंचायतीमध्ये होते आणि त्यामुळे १९९७ मध्ये नेरळ गावाची नळपाणी पुरवठा योजना झाली, त्या वेळी नेरळ गावातून ममदापूरला पाणी देण्यास सुरुवात झाली. आजपर्यंत ममदापूर गावाला नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेमधून पाणी दिले जाते आणि त्या बदल्यात नेरळ ग्रामपंचायत पाणीपट्टीही वसूल करीत होती. मात्र, मागील काही वर्षे ममदापूर गावाला फार अल्प दाबाने पाणीपुरवठा होत असून, त्या कारणाने ममदापूर ग्रामस्थ नेरळ ग्रामपंचायतला पाणीपट्टी भरत नाहीत. ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही वर्षांत होत असलेले नागरीकरण लक्षात घेता नेरळ ग्रामपंचायतीचे पाणी ममदापूर गावतील पहिल्या टप्प्यातून पुढे जात नाही. गेली काही वर्षे ममदापूर गावात ही समस्या असून, ममदापूर गावासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नळपाणी योजना मंजूर केली असून उल्हासनदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या त्या नळपाणी योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याने योजना पूर्ण होण्याचे वेळापत्रक निश्चित नाही. त्यामुळे आधीपासून ममदापूर गावात अर्ध्या भागातील पाणीपुरवठा ही समस्या आणखी कठीण बनत आहे. ममदापूरमधील भडवळ गावाकडील भागात असलेल्या १०० हून अधिक घरातील रहिवासी पावसाळा वगळता अन्य दिवशी उल्हासनदीवर बैलगाडीमधून पाणी आणतात. त्याच वेळी महिलादेखील कपडे धुुण्यासाठी दररोज गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या उल्हासनदीवर जात असतात. ही समस्या लक्षात घेऊन ममदापूर गावाच्या बाहेर मुस्लीम विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करणारा मदरसा आहे, त्या खानकाहे हे नाव असलेल्या मदरशामधील व्यवस्थापक सलीम दुराणी यांनी ममदापूर ग्रामस्थ यांची पाण्यासाठी वणवण बघून आपल्या संस्थेमधून एक पाइपलाइन टाकून ते पाणी खालच्या भागात दोन ठिकाणी टाक्या उभ्या करून त्यात सोडले. त्या दोन्ही टाक्यांना खाली नळ बसवून ठरावीक वेळी ते पाणी सोडून ममदापूर ग्रामस्थ आपली पाण्याची तहान भागवत असतात.
घरात पाणी येण्यासाठी पाइपलाइनचे काम सुरू
गावात नव्याने उपसरपंच झालेले जुबेर पालटे यांनी खानकाहेमधून आलेले पाणी हे सर्व ग्रामस्थांच्या घरात पोहोचले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू केले असून घरटी काही ठरावीक रक्कम काढून त्यात सर्व भागात पाइपलाइन फिरवली जात आहे. प्रत्येक घराजवळ टॅब मारून ठेवले आहेत. घरमालकाने आपल्या घरात पाणी नेण्यासाठी पाइपलाइन टाकून घ्यावी.
पाणी घरात नेण्याचे काम हाती घेतले आहे. खानकाहे या संस्थेमुळे ममदापूर गावातील महिलांची धावपळच कमी झाली नाही तर आता त्यांच्या घरात पाणी पोहोचले आहे. त्या भागात वस्ती करून राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लीम अशा सर्वांना खानकाहे संस्थेकडून पाणी मिळू लागल्याने ऐन पाणीटंचाई काळात ग्रामस्थांची धावपळ वाचली आहे.
आमच्याकडे भरपूर पाणी असल्याने आम्ही ग्रामस्थांची पाण्यासाठी हंडे घेऊन सुरू असलेली धावपळ बघून पाण्याची पाइपलाइन दिली. आता त्यांनी घरात नळ देऊन महिला भगिनींचे कष्ट आणखी कमी केले आहेत याचा आंनद आहे. - सलीम दुराणी, व्यवस्थापक, खानकाहे मदारशा
खानकाहे संस्थेने ममदापूर गावातील पाणीटंचाई असलेल्या भागात पाणी दिल्यानंतर आता आम्ही घरात पाणी पोहोचविण्याचे काम करीत आहोत. त्यासाठी आमचे उपसरपंच जुबेर पालटे जातीने लक्ष घालत असून नवीन नळपाणी योजना पूर्ण झाल्यावर आमचा सर्वांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. - दामा निगुर्डा, सरपंच
ममदापूरमधील ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती, ही परिस्थिती पाहून खानकाहे संस्थेने मदरशातून गावासाठी पाणी उपलब्ध करून दिले. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली. यामुळे ग्रामस्थ या संस्थेचे आभार मानत आहेत.