पाणीपुरवठामंत्र्यांनी रायगड जिल्हा परिषदेची थाेपटली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 01:17 AM2021-02-13T01:17:57+5:302021-02-13T01:18:04+5:30
जल जीवन मिशनअंतर्गत निधी कमी पडणार नसल्याची दिली ग्वाही
रायगड : जल जीवन मिशनअंतर्गत रायगड जिल्ह्यात आतापर्यंत चांगले काम करण्यात आले आहे. जल जीवन मिशनअंतर्गत कामांसाठी सरकार रायगड जिल्ह्याला निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अलिबाग येथे दिली. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचा आढावा गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या बैठकीत प्रत्येक तालुक्यानुसार जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळ कनेक्शन, शाळा, अंगणवाड्यांना जोडण्यात येणाऱ्या नळ कनेक्शनची माहिती घेतली. तसेच जिल्ह्यातील पूर्ण, अपूर्ण, प्रस्तावित नळ पाणीपुरवठा योजनांची माहिती घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पाणीपुरवठा विभागाचे उप कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांच्यासह गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागातील अधिकारी यांनी सविस्तर माहिती दिली.
रायगड जिल्ह्याला २०२०-२१ मध्ये एक लाख १० हजार ९०१ कुटुंबांना नळपाणी उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे एक लाख १९ हजार १८७ कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. तर २० नोव्हेंबरपासून ३४४ शाळा आणि एक हजार २३४ अंगणवाड्यांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण गावांपैकी ५५५ गावांमधील १०० टक्के घरांमध्ये नळ कनेक्शन देण्यात आले असल्याबद्दल गुलाबराव पाटील यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जल जीवन मिशन अंतर्गत येणारी रायगड जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. जिल्ह्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनांचा दरमहा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा. ३१ मार्चपर्यंत सर्व योजना पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करावे, अशा सूचना पाटील यांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना केल्या. तसेच याबाबत पुन्हा आढवा बैठक घेण्यात येणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, आ. भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे, आ. रवींद्र पाटील, माजी आ. मनोहर भोईर, जल जीवन मिशन संचालक आर. विमला, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या कार्याचा गौरव
जल जीवन योजनेंतर्गत उत्तम कार्य केल्याबद्दल रायगड जिल्हा परिषदेला सन्मानपत्र देऊन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागमंत्री गुलाबराव पाटील यांनी सन्मानित केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांनी सन्मानपत्र स्वीकारले. तसेच राज्यात १०० टक्के घरांना नळ कनेक्शन देणारा उरण तालुका प्रथम ठरल्याबद्दल सन्मानपत्र देऊन तालुक्याचा गौरव करण्यात आला. गटविकास अधिकारी नीलम गाडे, उप अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी हे सन्मानपत्र स्वीकारले.
उरणमध्ये १०० टक्के नळ कनेक्शन
जल जीवन मिशन अंतर्गत येणारी रायगड जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत अशा सूचना केल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी उरण तालुक्यातील घरांना १०० टक्के नळ कनेक्शन दिल्याचा दावा रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ. किरण पाटील यांनी केला हाेता. त्यानंतर उरण तालुक्यातूनच त्यांच्या दाव्याला आक्षेप घेण्यात आला हाेता.