नांदगाव/ मुरूड : मुरूड नगरपरिषद शहरी भागास आंबोली धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो; परंतु अचानकपणे पाणीपुरवठा करणाऱ्या दोन मोठ्या मशिन जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. बुधवारी मुरूड शहरास पाणीपुरवठा न झाल्याने शहरी नागरिकांना प्रचंड समस्येशी सामना करावा लागला.दोन्ही मशिन बंद झाल्याने पाणीपुरवठा करणे अवघड झाले आहे. अचानक मशिन बंद झाल्याने लोकांनी पाणीसाठाही न केल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. ज्यांच्याकडे बोरिंग मशिन आहे, त्यांना ही झळ पोहोचली नाही; परंतु जे नागरिक फक्त नळाच्या पाण्यावर अवलंबून आहेत, त्यांची मात्र या अचानक आलेल्या संकटाशी सामना करताना दमछाक झाली. शहराला गुरु वारी दुपारी ३पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे यांनी दिली. शहराला अचानक पाणीपुरवठा खंडित झाला हे कारण जरी सत्य असले, तरी सर्व पाणीपुरवठा कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर जोरदार काम सुरू केले आहे. मुरूड शहराला आंबोली धरणातून पाणीपुरवठा हा होत असतो. यासाठी दोन मोठ्या मशिनद्वारे हा पाणीपुरवठा अलंकापुरी येथील टाकीमध्ये साठवून मग शहराला पाणी पुरविले जाते; परंतु अचानक दोन्ही मुख्य मशिन जळाल्याने ही समस्या उद्भवली आहे. यातील एक मशिन तातडीने दुरु स्तीसाठी अलिबाग येथे पाठवण्यात आलेली आहे. ती गुरु वारी मिळणार असून त्वरित या मशिनद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे या वेळी भायदे यांनी सांगितले. यापुढे अशी समस्या उद्भवू नये, यासाठी विशेष प्रयोजन करण्याचा मानस भायदे यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी पिण्याचे पाणी नसल्याने मात्र शहरी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तर गुरु वारी दुपारपर्यंत पाणी मिळणार नसल्याने पाणीसंकट शहरवासीयांसमोर आहे. (वार्ताहर)
मुरूड शहरातील पाणीपुरवठा ठप्प
By admin | Published: February 16, 2017 2:08 AM