नऊ वर्षांपासून रखडली पाणीपुरवठा योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:50 AM2020-02-28T00:50:12+5:302020-02-28T00:50:22+5:30
पाणीटंचाईचा फटका; खंडाळे, नेहुली, सागाव, तळवली ग्रामस्थ संतप्त
- आविष्कार देसाई
अलिबाग : नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी भारत निर्माणअंतर्गत आखण्यात आलेली तब्बल अडीच कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना नऊ वर्षे रखडली आहे. त्यामुळेच खंडाळे, नेहुली, सागाव आणि तळवली येथील नागरिकांना या योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. राजकीय अनास्था आणि प्रशासकीय उदासीनतेचाच हा परिणाम असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.
‘लोकमत’ने या पाणीप्रश्नावर आवाज उठवल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. पाणीपुरवठा उपअभियंता एकनाथ कुदळे यांनी संबंधित ठेकेदारांची तातडीने बैठक बोलावत काम पूर्ण करण्याबबात तंबी दिली आहे. मे महिन्याच्या अखेरीस काम पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदाराने दिले आहे. त्यामुळे आणखीन तीन महिने नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.
खंडाळे परिसरातील पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी भारत निर्माण अंतर्गत दोन कोटी ५० लाख रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेला आॅक्टोबर २०११ रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली, तर १० फेब्रुवारी २०११ साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. काम सुरू केल्यानंतर अद्यापही योजना पूर्ण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना एमआयडीसीकडून पुरवण्यात येणाऱ्या पाण्यावर तसेच विहिरी यासह अन्य पर्यायांचा वापर करावा लागत असल्याने ते रोजच्या व्यापाला कंटाळले आहेत.
काम करताना आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील राजकारणामुळे काम पूर्ण करणे अवघड झाले आहे. ३१ मे २०२० अखेर काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन ठेके दारनरेश गोंधळी यांनी उपअभियंता एकनाथ कुदळे यांच्या समक्ष दिले. काम वेळेत पूर्ण न केल्यास ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येईल, असेही कुदळे यांनी सांगितले.
एक कोटी २८ लाख ८ हजार ८१२ रु. खर्च
ठेकेदार काम पूर्ण करत नसल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे.
आतापर्यंत उद्भव विहिरीसाठी दहा लाख ३६ हजार ९०३, उध्ववाहिनी तीन लाख ३२ हजार ४९२, वितरण व्यवस्था दोन लाख १२ हजार ३७६, पंपहाउस ७८ हजार, पम्पिंग मशीन सहा लाख १६ हजार ६७१, उंच साठवण टाकी १२ लाख २७ हजार १८७ रुपये, दुय्यम उंच टाकी २० लाख १०३ रुपये, फिडरमेन २१ लाख ५४ हजार २८ रुपये यासह अन्य खर्च एक लाख पाच हजार असे एकूण सुमारे एक कोटी २८ लाख ८ हजार ८१२ रुपये खर्च करण्यात आले आहेत, असे उपअभियंता एकनाथ कुदळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
योजनेसाठी पैसे आहेत. मात्र, ठेकेदार वेळेवर काम पूर्ण करत नसल्याने काम रखडले आहे. संबंधित ठेकेदाराला बोलवून काम लवकर पूर्ण करणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही कुदळे यांनी स्पष्ट केले.
70% काम आतापर्यंत पूर्ण
ठेकेदाराने आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण केले आहे. त्यासाठी त्याला सुमारे एक कोटी २८ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
उर्वरित ३० टक्के कामासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध आहे. त्यामुळे काम पूर्ण होण्यास प्रशासकीय पातळीवरून कोणतीच अडचण नाही.
ठेकेदाराच्या आश्वासनानुसार ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे; परंतु ठेकेदाराने पुन्हा चालढकल केल्यास नागरिकांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.
मे महिन्याच्या अखेरीस काम पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदाराने दिले आहे. त्यामुळे आणखीन
तीन महिने नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे.