पाणीपुरवठ्याची ३० काेटींची याेजना रखडली; धरणात पाणीसाठा असूनही वापर नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 01:31 AM2021-03-28T01:31:46+5:302021-03-28T01:31:52+5:30
पेण तालुक्यातील शहापाडा प्राधिकरण योजना
दत्ता म्हात्रे
पेण: तालुक्यातील शहापाडा प्राधिकरण योजनेतील ३० काेटी रुपयांची पाणी पुरवठा याेजना रखडली आहे. गेल्या चार वर्षांपासून २७ गावे आणि ४३ वाड्या या पाण्यावाचून वंचित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. प्राधिकरणाकडून काम पूर्ण हाेत नसेल तर मिलिटरीकडून हे काम करावे, अशा प्रतिक्रिया आता उमटत आहेत.
हेटवणे धरणात विपुल प्रमाणात पाणीसाठा आहे. मात्र त्या पाण्याचा एक थेंबभरही वापर या विभागातील ग्रामस्थांसाठी हाेत नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही याेजना मुदतीत पूर्ण करत नसल्याने दिसते आहे.
वाशी, वडखळ विभागाची पाणीटंचाई समस्या कायमची निकाली काढण्यासाठी लक्ष देणे गरजेचे असल्याचे बाेलले जाते. शहापाडा प्रादेशिक दक्षिण व उत्तर योजना कालबाह्य झाली आहे. उत्तर योजनेतील गावांची तहान भागवण्यासाठी शहापाडा धरणाची क्षमता नाही. त्यासाठी हेटवणे धरणाचे पाणी शहापाडा धरणात स्टोरेज करून ते शहापाडा उत्तर योजनेतील २७ गावे ४३ वाड्यांसाठी देणे गरजेचे आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून ३० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम २०१६ साली सुरू झाले. त्यामधे वाशी नाका ते वढाव गावापर्यंत आठ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे जे पाणी शहापाडा धरणात स्टोरेज करण्यासाठी आणायला हवे होते तिथं काम शून्य झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची दूरदृष्टी आणि लोकहिताचे प्राधान्यक्रमाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे. ठेकेदाराची अकार्यक्षमता व त्यावर घातलेल्या पांघरुणामुळे हेटवणे धरण उशाला आणि कोरड पडली घशाला अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे बाेलले जाते. दररोज पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवर सगळेच तोंड सुख घेतात. मात्र त्यांच्या शहापाडा धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला आहे. याकडे प्रशासन गांभीर्याने कधी पाहणार असा सवाल विचारला जात आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नीलिमा पाटील अध्यक्षस्थानी असताना ८० लाखाची जी योजना राबविण्यात आली होती. त्या योजनेतून सध्या पाणी पुरवठा होत आहे. मात्र तो उत्तर शहापाडा योजनेतील गावांना अपुरा पडत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या लाइनवर असलेले अनधिकृत नळ कनेक्शन यापैकी सहा नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत.
योजनेतील समोरच्या गावांमध्ये पाणीपुरवठा होतो, तर टोकावरची गावांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. चार दिवसांनंतर पाचव्या दिवशी पाणी मिळते. त्यासाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे मोर्चे, उपोषणे, आंदोलनचे सध्या पेव फुटले आहे.
पेणचे भाजप आमदार तथा माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी यासाठी प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्यासमवेत बैठक घेऊन टँकर लवकर सुरू करावेत, अशी मागणी केली. पेण तहसीलदार, गटविकास अधिकारी, जेएसडब्लू कंपनी यांच्या माध्यमातून तूर्तास पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्याची सक्त ताकीद अधिकारी वर्गाला दिली आहे.