- संतोष सापतेश्रीवर्धन : या वर्षी हवामानातील बदल व समुद्री वादळे यामुळे पर्जन्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. पयार्याने श्रीवर्धन तालुक्याला दुष्काळाची धग सोसावी लागत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील रानवली धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो, या धरणाने तळ गाठल्याने पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे.आजमितीस रानवली धरणातील पाणीसाठा ०.१३१ द. ल. घ. मी. शिल्लक आहे. त्यामुळे श्रीवर्धन नगरपरिषदेकडून एक दिवसाआड पाणी शहरातील नागरिकांना उपलब्ध केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना पेयजलाव्यतिरिक्त इतर पाण्यासाठी नैसर्गिक पारंपरिक जलस्रोत हातपंप, विहिरी, बोअरवेल याचा वापर करावा लागत आहे. श्रीवर्धन शहराची आजची लोकसंख्या १५२०० च्या जवळपास आहे. श्रीवर्धन नगरपालिकेच्या हद्दीतील नवी पेठ, मोहल्ला शिवाजी चौक, वाणी आळी, पेशवे आळी, महेश्वर पाखाडी, दाबक पाखाडी, जीवनेश्वर पाखाडी, विठ्ठल आळी या सर्व भागांत नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा केला जातो.रानवली धरणातील पाणीसाठा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत समाप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेला पेयजलासाठी टँकरव्यतिरिक्त दुसरा पर्याय उपलब्ध नाही. कारण शहरातील विहिरीमध्ये क्षारांचे प्रमाण आमूलाग्र आहे. क्षारयुक्त पाणी आरोग्यासाठी धोकादायक आहे. नगरपरिषदेच्या समोर पेयजलच्या गुणवत्तेचा प्रश्न आहे. त्यामुळे कोकणातील पाऊस लांबणीवर पडल्यास श्रीवर्धन तालुक्याचा पाणीप्रश्न गंभीर रूप धारण करू शकतो.श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी वादशेतवावे, (बोर्ली) कोंडेपंचतन, नागलोली या गावांना टँकरने पाणीपुरवठा चालू आहे, तसेच साक्षी भैरी (हरिहरेश्वर), गुलधे, बापवली, आदगाव, कासारकोंड येथील टँकरचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत. तालुक्यात १२ विंधण विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत, त्यापैकी तीन पूर्ण झाल्या आहेत तर एक व्यर्थ गेली आहे.कारविणे व कारविणे कोंडा जवळच्या विंधण विहिरी बुधवारी सायंकाळपर्यंत पूर्णत्वास जातील या पद्धतीने काम चालू आहे. हरिहरेश्वरला एका खासगी बोअरवेलची व्यवस्था तालुका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.श्रीवर्धन नगरपरिषद पाणीप्रश्नी सजग आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची रानवली धरणाची क्षमता आहे. तसेच आगामी काळात पाणीप्रश्न गंभीर बनून जनतेला त्रास होणार नाही, त्यासाठी टँकरचा प्रस्ताव तयार आहे. जनतेने नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे.- किरणकुमार मोरे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, श्रीवर्धनश्रीवर्धन तालुक्यातील जनतेला पेयजलाच त्रास होणार नाही, याची आम्ही पुरेपूर काळजी तालुका प्रशासनाने घेतली आहे. प्रशासनाकडे टँकर संदर्भात आलेल्या मागणीनुसार तत्काळ कार्यवाही करण्यात आली. टँकर, बोअरवेलची तरतूद प्रशासनाने केली आहे.- बाळासाहेब भोगे, गटविकास अधिकारी, श्रीवर्धनयावर्षी पडलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा परिणाम पर्यटन व्यवसायावर काही प्रमाणात जाणवत आहे. श्रीवर्धन शहरातील लोकांना व्यवस्थित पाणीपुरवठा करण्याचे दायित्व नगरपरिषद प्रशासन यशस्वीपणे पार पाडत आहे. जनतेच्या पाणीप्रश्नी नगरपरिषद प्रशासन तत्पर आहे.- वसंत यादव, पर्यटन सभापती, नगरपरिषद, श्रीवर्धन
श्रीवर्धन शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा, रानवली धरणाने गाठला तळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 2:24 AM