नेरळ : नेरळ पूर्व भागात सातत्याने जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत आहेत. पिण्याचे पाणी वाया जात असल्याने जलवाहिन्या फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत नेरळ ग्रामपंचायत विचार करीत असल्याची माहिती सरपंच जान्हवी साळुंखे यांनी दिली आहे.गेल्या महिन्यात येथील मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे जवळपास आठ दिवस नेरळ ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचाऱ्यांकडून काम सुरू होते. मंगळवारी, पहाटे पुन्हा नेरळ पूर्व भागात मध्य रेल्वेच्या पुलाच्या कामात तुटलेली जलवाहिनी पुन्हा तुटली. त्यामुळे याठिकाणी तळे साचले होते. सकाळी दहानंतर पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाºयांनी जलवाहिन्या दुरुस्त करण्यास सुरुवात केली. मात्र, तोपर्यंत नेरळ पूर्व भागात सकाळी वितरीत करण्यात आलेले पाणी बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.नेरळ गावातील अन्य भागाकडे दुर्लक्ष करून मध्यंतरी पाणीपुरवठा विभागाला रेल्वेने तोडलेल्या जलवाहिन्या जोडाव्या लागल्या होत्या. त्यानंतर इमारती बांधण्याची कामे करताना आणि रस्त्याची कामे करताना जेसीबी लावले जात आहेत. त्या वेळी खोदकाम सुरू करण्यापूर्वी नेरळ ग्रामपंचायतीला कोणतीही सूचना केली जात नसल्याने त्या भागातील नळपाणी योजनेच्या जलवाहिन्या फुटून लाखो लीटर पाणी वाया जात आहे.नेरळ ग्रामपंचायत खोदकामाबाबत एक रूपरेषा निश्चित करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे यापुढे कोणीही कुठेही खोदकाम करू शकत नाही आणि त्यामुळे जलवाहिन्या फुटण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.नेरळ ग्रामपंचायत सातत्याने फुटणाºया जलवाहिन्या याबाबत गंभीर असून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्याआधी यापुढे जलवाहिन्या फोडणाºयावर कारवाई करण्याचा विचार सुरू असून त्या निर्णयास लवकरच अंतिम स्वरूप देण्यात येईल, अशी माहिती सरपंच साळुंखे यांनी दिली आहे.
जलवाहिनी पुन्हा फुटली; हजारो लीटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:41 AM